

भारत सरकारने शनिवारी (दि.९) लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (सेवानिवृत्त) यांची भारताचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती जाहीर केली. तसेच व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांची पुढील नौदलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिकृत घोषणेनुसार, लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्यानंतर संरक्षण व्यवहार विभागात भारत सरकारचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत. सध्याचे सीडीएस अनिल चौहान यांचा कार्यकाळ ३० मे २०२६ रोजी पूर्ण होणार आहे.
राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात महत्त्वाची जबाबदारी
लेफ्टनंट जनरल राजा सुब्रमणी सप्टेंबर २०२५ पासून नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सेक्रेटरिएटमध्ये मिलिटरी ॲडव्हायझर म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी जुलै २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान उपलष्करप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
सेंट्रल कमांडचे प्रमुख म्हणूनही अनुभव
मार्च २०२३ ते जून २०२४ दरम्यान त्यांनी सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणूनही काम पाहिले.
भारत संयुक्त लष्करी समन्वय, थिएटर कमांड्स आणि सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण यावर भर देत असताना त्यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन बनणार नवे नौदलप्रमुख
दरम्यान, सध्या मुंबईत वेस्टर्न नेव्हल कमांडर म्हणून कार्यरत असलेले व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन ३१ मे रोजी पुढील नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत राहण्याची अपेक्षा आहे.
कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमध्ये विशेष प्राविण्य
१ जुलै १९८७ रोजी भारतीय नौदलात नियुक्त झालेल्या व्हाइस ॲडमिरल स्वामिनाथन यांना कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जाते. नौदलातील कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या ऑपरेशनल आणि धोरणात्मक पदांवर काम केले आहे.
'या' प्रतिष्ठित संस्थांचे माजी विद्यार्थी
खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी
श्रिव्हेनहॅम येथील जॉइंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज
करंजा येथील कॉलेज ऑफ नेव्हल वॉरफेअर
न्यूपोर्ट, रोड आयलंड येथील युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज
संरक्षण व्यवस्थेत मोठा नेतृत्वबदल
या नियुक्त्यांमुळे भारताच्या सर्वोच्च संरक्षण व्यवस्थेत मोठा नेतृत्वबदल होत आहे. दोन्ही वरिष्ठ अधिकारी आगामी काळात संरक्षण सज्जता, धोरणात्मक समन्वय आणि लष्करी आधुनिकीकरण मजबूत करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.