

बर्लिन/नवी दिल्ली : भारत कोणताही व्यापार करार घाईघाईने किंवा बंदुकीच्या धाकावर करणार नाही, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी अमेरिकेला ठणकावले. भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून व्यापार करारावरून तणावाची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर गोयल यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
जर्मनीतील ‘बर्लिन डायलॉग’ या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, भारत हा युरोपियन महासंघ आणि अमेरिकेसह अनेक देश आणि प्रदेशांसोबत व्यापार करारांबाबत सक्रियपणे चर्चा करत आहे. परंतु आम्ही कोणताही व्यापार करार घाईघाईने किंवा कुठल्याही दबावाखाली करणार नाही.
व्यापार करार हे दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले गेले पाहिजेत. भारत कधीही क्षणिक उत्साहात किंवा घाईत निर्णय घेत नाही. भारत उच्च शुल्काच्या दबावाचा सामना करण्यासाठी नव्या बाजारपेठांचा शोध घेत आहे, असे गोयल यांनी स्पष्ट केले.
जेव्हा गोयल यांना विचारले गेले की, भारताला अटींसह दीर्घकालीन आणि न्याय्य व्यापार करार मिळतो आहे का? तेव्हा ते म्हणाले की, ‘मला वाटत नाही की भारताने कधीही आपल्या मैत्रीचे निर्णय राष्ट्रीय हिताशिवाय इतर कोणत्याही गोष्टींवर आधारित केले आहेत. कोणी मला सांगेल की तुम्ही युरोपियन महासंघासोबत मित्र राहू शकत नाही, तर मी ते मान्य करणार नाही किंवा उद्या कोणी म्हणेल की तुम्ही केनियासोबत काम करू शकत नाही, तर तेही आम्हाला मान्य नाही.’
पियुष गोयल यांनी स्पष्ट केले की, व्यापार करार हे फक्त टॅरिफ किंवा बाजारपेठेत प्रवेशापुरतेच नसतात, तर ते विश्वास निर्माण करणे, दीर्घकाळासाठीचे संबंध आणि ‘ग्लोबल बिझनेस को ऑपरेशन’साठी शाश्वत आराखडा तयार करण्याकरिता असतात.
युरोपियन महासंघाशी कराराबाबत अद्याप मतभेद
भारत युरोपियन युनियनबरोबर अनेक दिवसांपासून प्रलंबित मुक्त व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी करत आहे. मात्र बाजारपेठेत प्रवेश, पर्यावरणीय मानके, आणि ‘रूल्स ऑफ ओरिजिन’च्या मुद्द्यावरून अजूनही मतभेद कायम आहेत. तसेच इतर देशांबरोबरच भारतीय निर्यातीवर ५० टक्के टॅरिफ लादणाऱ्या अमेरिकेबरोबरही व्यापारी वाटाघाटी सुरू आहेत. रशियाकडून भारताने तेल खरेदी करणे सुरू ठेवल्याबद्दल युरोपियन देशांनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी स्पष्ट केले की, भारत विचारपूर्वक निर्णय घेईल.
करार दीर्घकाळासाठी
भारताची व्यापार वाटाघाटींबाबतची भूमिका ही दीर्घकाळासाठीच्या धोरणावर आधारित आहे, तातडीचे व्यापार लक्ष्य गाठण्याच्या दबावावर नाही. व्यापार करार हे दीर्घकाळासाठी असतात. ते फक्त टॅरिफबद्दल नसतात, तर ते विश्वास आणि संबंधांबद्दलही असतात. तसेच व्यापार करार व्यवसायासाठीही असतात. एखाद्या देशाकडून विशिष्ट उत्पादन खरेदी करण्याचा निर्णय हा अखेर जागतिक पातळीवर सर्वांनी एकत्रितपणे घ्यायचा असतो, असे त्यांनी नमूद केले. या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे. कारण अमेरिका सध्या भारतावर रशियाकडून कच्चे तेल खरेदी थांबविण्यासाठी दबाव आणत आहे. गोयल हे इतर अनेक महत्त्वाच्या विषयांबरोबर भारत-युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी सध्या जर्मनीमध्ये आहेत.