LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात

समुद्री व्यापार मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे व्यावसायिक गॅस साठ्यांवर ताण वाढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील अनेक मोठ्या हॉटेल आणि केटरिंग व्यवसायांना पर्यायी उपाय शोधावे लागत आहेत.
LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात
'एआय' ने बनविलेली प्रतिमा
Published on

मध्यपूर्वेतील तणावामुळे व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडर टंचाईच्या बातम्या समोर येत असताना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने नागरिकांना गॅस बचतीसाठी काही सोपे उपाय सुचवले आहेत.

मुंबई, पुणे आणि देशातील अनेक शहरांमध्ये हॉटेल व रेस्टॉरंट संघटनांनी गॅस पुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास उपाहारगृहे काही दिवसांत बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर IOC ने दिलेला सल्ला महत्त्वाचा ठरत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर घरगुती गॅस बचतीसाठी ऊर्जा कार्यक्षम स्वयंपाक पद्धती वापरण्याचे आवाहन केले आहे.

प्रेशर कुकरचा वापर करा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सांगितले की, प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक केल्यास अन्न लवकर शिजते आणि एलपीजीची मोठ्या प्रमाणात बचत होते.

तसेच, प्रेशर कुकरमध्ये सेपरेटर वापरल्यास भात, डाळ आणि भाज्या एकाच वेळी शिजवता येतात, ज्यामुळे स्वयंपाक अधिक कार्यक्षम आणि ऊर्जा बचत करणारा ठरतो.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने पोस्टमध्ये म्हटले आहे, "LPG बचतीसाठी प्रेशर कुकरचा वापर करा. त्यामुळे स्वयंपाकाचा वेळ कमी होतो आणि गॅसची बचत होते. कुकरमध्ये सेपरेटर वापरून अनेक पदार्थ एकाच वेळी शिजवता येतात."

उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा

उकळी आल्यानंतर गॅस कमी ठेवणे ही गॅस बचतीची एक सोपी आणि प्रभावी सवय मानली जाते. अनेकदा पदार्थाला उकळी आल्यानंतरही गॅस मोठ्या आचेवर ठेवला जातो, मात्र त्यामुळे अन्न लवकर शिजत नाही, उलट गॅसचा वापर अधिक होतो.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पोस्टनुसार, उकळी आल्यानंतर आच कमी केल्यास स्वयंपाक व्यवस्थित होतो आणि जवळपास २५ टक्क्यांपर्यंत गॅसची बचतही होऊ शकते. त्यामुळे ऊर्जा संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्यासाठी ही छोटी सवय अंगीकारणे महत्त्वाचे मानले जाते.

याशिवाय, स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य तयार ठेवणे ही गॅस बचतीची महत्त्वाची सवय मानली जाते. अनेकदा कढई गॅसवर ठेवून नंतर भाजी चिरणे किंवा मसाले शोधणे सुरू होते, त्यामुळे गॅस अनावश्यकपणे जळत राहतो. तसेच स्वयंपाक करताना भांड्याचा योग्य आकार निवडणे, बर्नर स्वच्छ ठेवणे आणि अन्न झाकण ठेवून शिजवणे या सवयींमुळे गॅसचा वापर कमी होऊ शकतो.

तसेच, फ्रिजमधील पदार्थ आधी बाहेर काढून सामान्य तापमानावर आणणे यामुळेही गॅसची बचत होते. तज्ज्ञांच्या मते, अशा छोट्या सवयी रोजच्या स्वयंपाकात पाळल्यास गॅस सिलिंडर अधिक दिवस चालण्यास मदत होऊ शकते.

हॉटेल उद्योगाची चिंता

दरम्यान, समुद्री व्यापार मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे व्यावसायिक गॅस साठ्यांवर ताण वाढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील अनेक मोठ्या हॉटेल आणि केटरिंग व्यवसायांना पर्यायी उपाय शोधावे लागत आहेत.

या पार्श्वभूमीवर IRCTCच्या पश्चिम विभागाने सर्व केटरिंग परवानाधारकांना तातडीने पर्यायी स्वयंपाक पद्धती वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

LPG Saving Tips : गॅस बचतीसाठी Indian Oilचा सल्ला; 'या' टिप्स ठेवा लक्षात
IRCTCचा महत्त्वाचा निर्णय; LPG टंचाईमुळे रेल्वे केटरिंगमध्ये इंडक्शन वापरण्याचे निर्देश

यामध्ये विशेषतः मायक्रोवेव्ह, इंडक्शन स्टोव्ह आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. हे निर्देश फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि जनआहार केंद्रांनाही लागू करण्यात आले आहेत.

LPG टंचाई नसल्याचा दावा

दुसरीकडे ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष पी. एन. सेठ यांनी गॅस टंचाईच्या बातम्या फेटाळल्या आहेत.

ANIशी बोलताना त्यांनी सांगितले की, "सध्या एलपीजी सिलिंडरची कोणतीही टंचाई नाही. व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही प्रकारच्या सिलिंडरचा पुरवठा पूर्वीसारखाच सुरू आहे. घरगुती क्षेत्राला प्राधान्य देण्यात येत आहे." सरकार, वितरक आणि इतर संबंधित घटकांसोबत बैठका घेऊन पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in