कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी वाढणार! IRCTC ने नियमात आजपासून केला ‘हा’ बदल

भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. आज (२९ डिसेंबर) पासून सामान्य आरक्षणाच्या (Advance Reservation Period - ARP) पहिल्या दिवशी आधार लिंक असलेल्या IRCTC खात्यांद्वारे तिकीट बुकिंगची वेळ बदलली जाणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. आज (२९ डिसेंबर) पासून सामान्य आरक्षणाच्या (Advance Reservation Period - ARP) पहिल्या दिवशी आधार लिंक असलेल्या IRCTC खात्यांद्वारे तिकीट बुकिंगची वेळ बदलली जाणार आहे.

अनेकदा तिकीट बुक करून देणारे दलाल मोठ्या प्रमाणात तिकीट काढून ते जास्त दराने विकतात. परिणामी, सामान्य प्रवाशांना वेळेवर तिकीट मिळत नाही. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि खऱ्या प्रवाशांना तिकीटांचा फायदा मिळावा यासाठी भारतीय रेल्वेने ऑनलाईन आरक्षण प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्वी, सामान्य आरक्षण सुरू झाल्यानंतर फक्त पहिल्या १५ मिनिटांत आधार लिंक वापरकर्त्यांनाच तिकीट बुक करता येत होते. त्यानंतर ही वेळ सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत वाढवण्यात आली होती. आता रेल्वेने ही वेळ आणखी वाढवून सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत केली आहे. पुढील टप्प्यात, परिस्थितीचा आढावा घेऊन ही वेळ टप्प्याटप्प्याने रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.

IRCTC वेबसाइट आणि ॲपवरच नियम लागू

रेल्वे बोर्डाच्या १८ डिसेंबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार, सामान्य आरक्षणाच्या पहिल्या दिवशी ऑनलाईन तिकीट बुक करताना आधार लिंक असलेले IRCTC खाते असणे आवश्यक राहील. महत्त्वाची बाब म्हणजे पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिमद्वारे काउंटरवर तिकीट बुकिंग करण्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, जर तुम्ही रेल्वे स्टेशनवरील तिकीट काउंटरवरून तिकीट बुक करत असाल, तर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशनची गरज भासणार नाही. ही नवीन सुविधा केवळ ऑनलाइन पद्धतीने IRCTC बुकिंगसाठी लागू आहे.

रेल्वे चार्ट तयार करण्याची वेळ

रेल्वेच्या नव्या नियमानुसार, प्रवाशांनी लक्षात घ्यावे की सकाळी ५:०१ ते दुपारी २:०० दरम्यान सुटणाऱ्या गाड्यांचा पहिला आरक्षण चार्ट मागील दिवशी रात्री ८ वाजेपर्यंत तयार केला जाईल.

दुपारी २:०१ ते रात्री ११:५९ आणि मध्यरात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान सुटणाऱ्या गाड्यांचा आरक्षण चार्ट गाडी सुटण्याच्या किमान १० तास आधी तयार केला जाणार आहे.

प्रवाशांसाठी काय महत्त्वाचं?

हा बदल प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार असून, तिकीट दलालांवर नियंत्रण आणण्यास मदत करणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपलं IRCTC खाते आधारशी लिंक करून ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in