अमेरिकेत आणखी एक भारतीय ठार; डलासमध्ये विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डलास शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डलासमध्ये एका २७ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची पेट्रोल पंपावर काम करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
अमेरिकेत आणखी एक भारतीय ठार; डलासमध्ये विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या
Published on

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डलास शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डलासमध्ये एका २७ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची पेट्रोल पंपावर काम करत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मृत तरुणाचे नाव चंद्रशेखर पोल असून तो मूळचा तेलंगणातील हैदराबादचा रहिवासी आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी उशिरा रात्री घडली. डलासच्या उपनगरातील एका पेट्रोल पंपावर चंद्रशेखर काम करत होता. अचानक आलेल्या एका अज्ञात बंदूकधाऱ्याने त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पसार झाला. चंद्रशेखरला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

पेट्रोल पंपावर पार्ट-टाइम नोकरी

चंद्रशेखर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. तो डलासमधील नॉर्थ टेक्सास विद्यापीठात डेटा ॲनालिटिक्सचे शिक्षण घेत होता. त्याने भारतामध्ये बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीचे शिक्षण (BDS) पूर्ण केले होते. तो अमेरिकेत पूर्णवेळ नोकरीच्या शोधात होता आणि सध्या पेट्रोल पंपावर पार्ट-टाइम काम करून स्वतःचा खर्च भागवत होता. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, त्याने सहा महिन्यांपूर्वी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली होती आणि लवकरच डेटा सायन्स क्षेत्रात नोकरी मिळण्याची अपेक्षा होती.

एकुलता एक मुलगा

चंद्रशेखरच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले, तो आमचा एकुलता एक मुलगा होता. तो डॉक्टर झाला, मग अमेरिकेत शिकायला गेला. आम्हाला वाटले त्याचे भविष्य उज्ज्वल होईल, पण देवाने सगळं संपवलं.

सरकारकडे पार्थिव परत आणण्याची मागणी

चंद्रशेखरचे वडील स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांनी पार्थिव भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) आमदार टी. हरीश राव यांनी शोकाकुल कुटुंबाची भेट घेतली आणि राज्य व केंद्र सरकारकडे मदत पुरविण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अद्याप या घटनेवर औपचारिक निवेदन जारी केलेले नाही. भारतीय दूतावासाने मात्र डलासमधील स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेत भारतीयांवर वाढते हल्ले

अमेरिकेत गेल्या काही महिन्यांत भारतीयांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. काही आठवड्यांपूर्वी हरियाणातील एका व्यक्तीला दुकानाबाहेर लघवी करण्यास मज्जाव केल्याने गोळ्या झाडून ठार मारण्यात आले. त्याच महिन्यात यूएस इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) सुविधेत झालेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे अमेरिकेत शिकणाऱ्या आणि काम करणाऱ्या भारतीय समुदायात भीतीचे वातावरण आहे.

डलास पोलिस विभागाने हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. हा केवळ लुटीचा प्रयत्न होता की वांशिक द्वेषातून प्रेरित गुन्हा याचा तपास सुरू आहे, असे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in