चॉकलेटमध्ये काचेचा तुकडा; स्विगीच्या NOICE ब्रँडवर आरोप, कंपनीची पहिली प्रतिक्रिया समोर

चॉकलेट खाताना त्याने एक तुकडा आपल्या मुलाला दिल्यावर मुलाने तोंडाला काहीतरी टोचल्याची तक्रार केली. तपासणी केल्यावर चॉकलेटमध्ये काचेचा तुकडा आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
चॉकलेटमध्ये काचेचा तुकडा; स्विगीच्या NOICE ब्रँडवर आरोप, कंपनीची पहिली प्रतिक्रिया समोर
Published on

स्विगी (Swiggy) च्या NOICE या ब्रँडच्या डार्क चॉकलेटमध्ये काचेचा तुकडा सापडल्याचा दावा एका युजरने केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर ग्राहकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुलाला चॉकलेट देताना उघडकीस आला प्रकार

ही घटना एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समोर आली. Pras SwiftMojo नावाने ओळखल्या जाणाऱ्या युजरने चॉकलेट ऑर्डर केल्याचे सांगितले. चॉकलेट खाताना त्याने एक तुकडा आपल्या मुलाला दिल्यावर मुलाने तोंडाला काहीतरी टोचल्याची तक्रार केली. तपासणी केल्यावर चॉकलेटमध्ये काचेचा तुकडा आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर संतापाची लाट

या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित बाब असल्याने अन्नसुरक्षेत कोणताही निष्काळजीपणा चालणार नाही, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

उत्पादन प्रक्रियेत गंभीर त्रुटीचा संशय

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एका फूड टेक्नॉलॉजिस्टने सांगितले की, अशा प्रकारे काचेचा तुकडा सापडणे म्हणजे उत्पादन प्रक्रियेत मोठा बिघाड झाल्याचे संकेत आहेत. अन्न उत्पादन यंत्रणांमध्ये काचेच्या वस्तूंवर कडक नियंत्रण ठेवले जाते आणि त्या तुटल्यास तत्काळ कारवाई करणे आवश्यक असते.

काच कशी पोहोचली?

तज्ज्ञांच्या मते, हा प्रकार दोन कारणांमुळे घडू शकतो, उत्पादन सुरू होण्यापूर्वी बाहेरील काच यंत्रात जाणे किंवा उत्पादन प्रक्रियेदरम्यान काचेची वस्तू तुटणे. दोन्ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहेत.

गुणवत्ता नियंत्रणावर प्रश्नचिन्ह

तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारात उत्पादन लाइन तात्काळ थांबवून संपूर्ण तपास (Root Cause Analysis) करणे गरजेचे असते. आवश्यक असल्यास संपूर्ण बॅच बाजारातून मागे घेणे (Recall) हीही प्रक्रिया राबवली जाते.

NOICE ब्रँडकडून प्रतिक्रिया

दरम्यान, या प्रकरणावर NOICE ब्रँडने X वर प्रतिक्रिया दिली आहे. "हा प्रकार गंभीर असून ग्राहकांच्या सुरक्षेला आम्ही अत्यंत महत्त्व देतो. संबंधित ग्राहकाशी संपर्क साधला असून उत्पादन करणाऱ्या भागीदारासोबत तसेच संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू आहे," असे कंपनीने स्पष्ट केले.

चौकशी सुरू, कारवाईची मागणी

या प्रकरणी अधिकृत तपास सुरू असून ग्राहकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. अशा घटना टाळण्यासाठी अधिक कडक नियम आणि नियंत्रण यंत्रणा लागू करण्याची गरज व्यक्त होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in