भारतात 6G ची जबरदस्त तयारी; २०३० पर्यंत हाय-स्पीड इंटरनेटचे लक्ष्य

6G तंत्रज्ञानामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित उपकरणांचा अनुभव अधिक दर्जेदार होणार आहे. 6G आल्यानंतर AR/VR, AI-युक्त डिव्हाइसेस आणि ऑटोनॉमस मोबिलिटी यांचा वापर अधिक सोपा व प्रभावी होईल.
भारतात 6G ची जबरदस्त तयारी; २०३० पर्यंत हाय-स्पीड इंटरनेटचे लक्ष्य
Photo: Canva
Published on

भारतामध्ये अजूनही 5G नेटवर्कचा विस्तार सुरू असला, तरी त्याचबरोबर 6G वरही मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू झालं आहे. या दिशेने महत्त्वपूर्ण पावलं उचलत IIT हैदराबादने 7 गीगाहर्ट्झ बँडमध्ये 6G प्रोटोटाइपचं यशस्वी परीक्षण केलं आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर २०३० पर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सध्याच्या 5G पेक्षा हे अधिक वेगवान असून गाव-शहर, आकाश, जमीन आणि समुद्र अशा प्रत्येक स्तरावर मजबूत कनेक्टिव्हिटी देईल.

या संशोधनामुळे भारत नवी ऊंची गाठून 6G चा केवळ वापरकर्ता न राहता जागतिक स्तरावर याचा मार्गदर्शक देश ठरेल, असा विश्वास दूरसंचार तज्ज्ञ व आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक किरण कुची यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, साधारणपणे दर १० वर्षांनी मोबाईल टेक्नॉलॉजीची नवी पिढी विकसित केली जाते. 5G तंत्रज्ञानाचा पाया २०१० ते २०२० या काळात रचला गेला आणि २०२२ पासून भारतात त्याचा विस्तार सुरू झाला. त्याच पद्धतीने 6G प्रोटोटाइपची तयारी २०२१ मध्ये सुरू झाली असून, २०३० पर्यंत हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

6G AI चिपसेट्सचे काम सुरू

6G तंत्रज्ञान अधिक परिणामकारक करण्यासाठी आयआयटी हैदराबादने विशेष लो-पॉवर सिस्टीम चिप तयार केली आहे. या चिपच्या मदतीने नागरी तसेच संरक्षण क्षेत्रात जमिनीवरील (टेरेस्ट्रियल) आणि उपग्रहावरील (सॅटेलाइट) कनेक्टिव्हिटी सहज उपलब्ध होईल. सध्या हेच तंत्रज्ञान पुढे विकसित करून उच्च कार्यक्षमतेचे 6G AI चिपसेट्स तयार करण्याचे काम सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, भारताचे हे पाऊल त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात ठाम स्थान मिळवून देईल.

6G तंत्रज्ञानामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित उपकरणांचा अनुभव अधिक दर्जेदार होणार आहे. 6G आल्यानंतर AR/VR, AI-युक्त डिव्हाइसेस आणि ऑटोनॉमस मोबिलिटी यांचा वापर अधिक सोपा व प्रभावी होईल. फॅक्टरी, शाळा, रुग्णालये, संरक्षण व्यवस्था तसेच आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये 6G डिव्हाइसेस महत्त्वपूर्ण भूमिका बाजवतील. यामुळे देशाची उत्पादकता वाढेल आणि सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होतील.

विकसित भारताच्या स्वप्नाकडे वाटचाल

अलीकडच्या काळात भारताने नेटवर्क्स, डिव्हाइसेस, AI ॲप्लिकेशन्स आणि फॅबलेस चिप डिझाईन यामध्ये स्वदेशी इनोव्हेशनला मोठे प्रोत्साहन दिले आहे. याच जोरावर भारत आज जागतिक स्तरावर ग्लोबल सप्लायर आणि स्टँडर्ड सेटर म्हणून ओळखला जात आहे. २०३० मध्ये जेव्हा जगभरात 6G चा विस्तार होईल, तेव्हा भारत आपल्या स्वतःच्या टेक्नॉलॉजी, प्रॉडक्ट्स, कंपन्या आणि इकोसिस्टीमच्या जोरावर २०४७ पर्यंत विकसित भारताच्या स्वप्नाकडे ठाम पावले टाकेल.

logo
marathi.freepressjournal.in