

गेल्या काही दिवसांमध्ये इंडिगो एयरलाइन्सची तब्बल ७५० उड्डाणे रद्द झाली होती. त्यामुळे हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले होते. देशभरात उड्डाण सेवा कोलमडलेल्या पार्श्वभूमीवर IndiGo Airlines ने शुक्रवारी (दि.५) निवेदन जारी करत प्रवाशांची माफी मागितली. "आम्ही सर्व प्रवाशांची माफी मागतो." असे म्हणत त्यांनी माफीनामा जाहीर केला आहे.
इंडिगोने माफीनाम्यात म्हटले आहे, “आमच्या सर्व प्रवाशांची आम्ही मनापासून माफी मागतो. गेले काही दिवस तुमच्यासाठी किती कठीण गेले याची आम्हाला जाणीव आहे. ही समस्या एका रात्रीत सुटणार नाही, पण आम्ही शक्य ती सर्व पावले उचलून परिस्थिती लवकरात-लवकर सुरळीत करू.”
एअरलाइन्सने पुढे म्हटले, “सर्व सिस्टम व शेड्यूल रीबूट करण्याचे काम सुरू आहे. मंत्रालय व नागरी विमान वाहतूक महासंचालनालयासोबत समन्वय वाढवण्यात आला आहे. विमानतळांवरील गर्दी टाळण्यासाठी अल्पकालीन ‘प्रोऍक्टिव्ह कॅन्सलेशन्स’ करण्यात येत आहेत."
युद्धपातळीवर काम सुरु
कंपनीने म्हटले की, “आमची विश्वासार्हता नेहमीच ओळखली गेली आहे, परंतु मागील काही दिवसांपासून आम्ही गंभीर संकटाला सामोरे गेलो आहोत. अनेक प्रवाशांची उड्डाणे रद्द झाली, काहीजण विमानतळांवर तासन्तास थांबले. हे सर्व सुरळीत करण्यासाठी आमची सर्व टीम युद्धपातळीवर काम करत आहे.”
रद्द उड्डाणांचा पूर्ण रिफंड- हॉटेल, बस, जेवणाची व्यवस्था
प्रवाशांना दिलासा देण्यासाठी इंडिगोने मोठ्या घोषणा केल्या आहेत. सर्व रद्द उड्डाणांचे रिफंड मूळ पेमेंट मोडवर आपोआप जमा होणार आहे. विविध शहरांमध्ये हजारो हॉटेल रूम्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्फेस ट्रान्सपोर्टची सोय उपलब्ध आहे. ५ ते १५ डिसेंबरमधील सर्व बुकिंग्सवर कॅन्सलेशन आणि रीस्केड्यूल फी माफ करण्यात येईल. विमानतळांवर अडकलेल्या प्रवाशांना जेवण–नाश्ता उपलब्ध असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शक्य असेल तिथे ‘लाउंज ऍक्सेस’ अर्थात सुविधा उपलब्ध असलेल्या विभागाची सोय केली जाईल.