इंडिगोच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

प्रवाशांनी गच्च भरलेले इंडिगोचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान (फ्लाइट क्रमांक ६ ई ७६२) मंगळवारी (दि. ३०) सकाळी बॉम्बच्या धमकीमुळे चर्चेत आले. सुमारे २०० प्रवासी असलेल्या या विमानाबाबत सुरक्षा यंत्रणांना संदेश मिळताच खळबळ उडाली.
इंडिगोच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या  विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Photo - FPJ
Published on

प्रवाशांनी गच्च भरलेले इंडिगोचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान (फ्लाइट क्रमांक ६ ई ७६२) मंगळवारी (दि. ३०) सकाळी बॉम्बच्या धमकीमुळे चर्चेत आले. सुमारे २०० प्रवासी असलेल्या या विमानाबाबत सुरक्षा यंत्रणांना संदेश मिळताच खळबळ उडाली.

मुंबईहून उड्डाण घेणाऱ्या या एअरबस ए ३२१ निओ विमानाच्या सुरक्षेबाबत धमकी मिळताच, अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई सुरू केली. संदेशात धोका नेमका काय आहे? याचा तपशील नसला तरी दिल्ली विमानतळावर यंत्रणा सतर्क झाल्या.

इंडिगोचे स्पष्टीकरण

या घटनेनंतर इंडिगोने स्पष्ट केले की, ३० सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईहून दिल्लीला निघालेल्या फ्लाइटमध्ये सुरक्षेचा धोका आढळला. प्रोटोकॉलनुसार आम्ही तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली. विमानाला उड्डाणासाठी परवानगी मिळण्यापूर्वी सर्व आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. आम्ही प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. याशिवाय प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी म्हणून अल्पोपहार, माहितीचे अपडेट्स आणि आवश्यक मदत पुरवण्यात आल्याचेही इंडिगोने नमूद केले.

सुखरूप लँडिंग

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइटच्या माहितीनुसार ही फ्लाइट दिल्ली विमानतळावर सकाळी ७.५३ ला सुरक्षित उतरली. प्रवाशांना कोणतीही अडचण न येता ते सुखरूप पोहोचले. मात्र, दिल्ली विमानतळावर तैनात सुरक्षा दलाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून सर्व उपाय केले.

मागील आठवड्यातही अशीच धमकी

याआधीच, १९ सप्टेंबरला मुंबईहून फुकेतला (थायलंड) जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट ६ ई १०८९ ला देखील बॉम्बची धमकी मिळाली होती. त्या वेळी या विमानाला चेन्नई विमानतळावर वळवण्यात आले होते. CISF आणि अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर धमकी खोटी असल्याचे निष्पन्न झाले.

सततच्या धमक्यांमुळे चिंता

सलग दोन आठवड्यांत इंडिगोच्या विमानांना अशा धमक्या मिळाल्याने प्रवाशांमध्ये आणि विमान कंपनीत चिंता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा संदेशांमुळे प्रवासात अनावश्यक भीतीचे वातावरण तयार होते. तसेच, सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि साधनसामग्री गुंतवावी लागते. मंगळवारी झालेल्या घटनेत कुठलाही धोका उद्भवला नसला तरी या सततच्या धमक्यांमुळे हवाई सुरक्षेची कसोटी लागली असून तपास यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in