

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बुधवारी (दि.१८) पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीतील एका घराला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू, तर ३ जण गंभीर जखमी झाले. पहाटे सर्वजण झोपेत असतानाच आग लागल्याने अनेकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. आग लागल्यानंतर काही क्षणांतच घरातून मोठे स्फोटाचे आवाज येऊ लागले आणि काही वेळात संपूर्ण घर आगीने वेढले गेले.
EV चार्जिंगदरम्यान शॉर्ट सर्किटचा संशय
प्राथमिक तपासानुसार, घराबाहेर उभी असलेली इलेक्ट्रिक कार (EV) चार्जिंगला लावलेली असताना शॉर्ट सर्किट झाले आणि त्यानंतर गाडीने पेट घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही आग काही क्षणांतच घरापर्यंत पोहोचली.
गॅस सिलिंडर स्फोटामुळे वाढली तीव्रता
घरात स्वयंपाकासाठी आणून ठेवलेले १० हून अधिक एलपीजी सिलिंडर आगीच्या संपर्कात आल्याने एकामागोमाग एक स्फोट झाले. त्यामुळे आग अधिक भडकली आणि घराचा काही भाग कोसळल्याचेही सांगण्यात येत आहे.
७ जण अडकले, ३ जणांनी वाचवला जीव
या दुर्घटनेत ३ जणांनी कसेबसे बाहेर पडून जीव वाचवला, मात्र ७ जण घरातच अडकून जळून मृत्यूमुखी पडले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
नववधूच्या स्वागताची तयारी
मिळालेल्या माहितीनुसार, सौमिल पुगालिया आणि सखी यांचा २३ जानेवारी २०२६ रोजी विवाह झाला होता. नववधूच्या स्वागतासाठी कुटुंबाने घरी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी केटरिंगची तयारी सुरू होती आणि मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर घरात ठेवण्यात आले होते.
एक दिवसाच्या उशिरामुळे वाचला जीव
लग्नानंतर सखी माहेरी गेली होती. ती मंगळवारी परत येणार होती, मात्र घरच्यांनी तो दिवस अशुभ मानत कार्यक्रम पुढे ढकलला. त्यानंतर बुधवारी येण्याचे ठरले, पण त्याआधीच पहाटे ही दुर्घटना घडली. त्यामुळे एका दिवसाच्या उशिरामुळे तिचा जीव वाचला, असे कुटुंबीयांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक लॉकमुळे कुटुंब अडकले
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, घरात इलेक्ट्रॉनिक डोअर लॉक बसवण्यात आले होते. आगीदरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्याने हे लॉक उघडले नाहीत, त्यामुळे काही जण आतच अडकून पडले. नंतर बचाव पथकांनी दरवाजे फोडून आत प्रवेश केला, मात्र तोपर्यंत मोठी जीवितहानी झाली होती.
तपास सुरू
या दुर्घटनेनंतर पोलिसांनी आणि प्रशासनाने तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात EV चार्जिंगदरम्यान झालेले शॉर्टसर्किट, त्यानंतर लागलेली आग आणि गॅस सिलिंडर स्फोट ही दुर्घटनेची प्रमुख कारणे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे इंदूरमध्ये हळहळ व्यक्त होत असून, घरांमध्ये मोठ्या प्रमाणात सिलिंडर साठवणे, इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग आणि इलेक्ट्रॉनिक सुरक्षाव्यवस्थांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.