आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ११५० कोटी रुपयांचे कोकेन जप्त, ३ परदेशी नागरिकांना अटक

गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात संयुक्त कारवाई करत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ११५० कोटी रुपयांचे कोकेन जप्त, ३ परदेशी नागरिकांना अटक
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ११५० कोटी रुपयांचे कोकेन जप्त, ३ परदेशी नागरिकांना अटक
Published on

अहमदाबाद : गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात संयुक्त कारवाई करत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. मुंद्रा बंदराजवळ एका मालवाहू जहाजातून तब्बल ११५ किलो कोकेन जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे १,१५० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी तीन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

ब्राझील ते मुंद्रा प्रवास

गुजरात पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अंमली पदार्थ 'युरोप' नावाच्या कार्गो जहाजातून आणले जात होते. या जहाजाने लॅटिन अमेरिका, मेक्सिको, अमेरिका आणि पाकिस्तानमधील कराची असा प्रवास केला होता. अखेर ते गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ नांगरले गेले. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२५ मध्ये ब्राझीलमध्ये हे कोकेन जहाजावर चढवण्यात आले होते आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नकळत ते इंजिन रूममध्ये लपवून ठेवण्यात आले होते.

एअरटॅग्जचा वापर

जहाजावरून जुमा नासिर ओमर या तांझानियन नागरिकाला रंगेहात अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गुजरात एटीएसने दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्लीतील द्वारका परिसरातून अंमली पदार्थांची डिलिव्हरी घेणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले. यात केल्विन चुकवूआमा (नायजेरियन नागरिक) आणि बैरुंगे जेम्स (युगांडाचा नागरिक) यांचा समावेश आहे. तस्करांनी हे ड्रग्ज ट्रॅक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता. जप्त केलेल्या गोण्यांमधून ४ ॲपल एअरटॅग्ज जीपीएस आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. यावरून या ड्रग्जच्या प्रवासावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नजर ठेवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ११५० कोटी रुपयांचे कोकेन जप्त, ३ परदेशी नागरिकांना अटक
मुंबईत मोठे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ३४९ किलो कोकेन जप्त, किंमत १७४५ कोटी, अमित शहांकडून कौतुक

पुढील तपास सुरू

हे ड्रग्ज दिल्लीत पोहोचवल्यानंतर पुढे कुठे नेले जाणार होते आणि भारताबाहेर पाठवले जाणार होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींची कसून चौकशी केल्यानंतरच पुढील माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या ५ वर्षांतील आयसीजी आणि गुजरात एटीएसची ही १५ वी यशस्वी संयुक्त मोहीम आहे. या कारवाईत स्थानिक कोस्टल पोलीस आणि मुंद्रा पोर्ट ऑथॉरिटीनेही महत्त्वाची भूमिका बजावली.

आरोपींचा समुद्रात उडी मारण्याचा प्रयत्न

२५ मे च्या रात्री एटीएसला या तस्करीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर एटीएस आणि तटरक्षक दलाने २६ मे च्या पहाटे मुंद्रा बंदराच्या बाहेरील भागात 'युरोप' जहाजाची नाकेबंदी केली. सुरक्षा दलांना जवळ येताना पाहून जहाजावरील तस्करांनी अंमली पदार्थांनी भरलेल्या ६ गोण्या समुद्रात फेकून दिल्या. हवामान खराब आणि दृश्यमानता कमी असतानाही तटरक्षक दलाने समुद्रातून ५ गोण्या शोधून काढण्यात यश मिळवले, तर एक गोणी बेपत्ता आहे. या ५ गोण्यांमधून ११५ किलो वजनाची ११५ कोकेनची पाकिटे जप्त करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात १ किलो कोकेनची किंमत साधारण १० कोटी रुपये आहे. या कारवाई दरम्यान, जुमाने नावाच्या एका तांझानियन नागरिकाने समुद्रात उडी मारली. तटरक्षक दलाकडून सध्या त्याचा शोध घेतला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in