IPS पूरन कुमार आत्महत्या प्रकरण : ९ पानी चिठ्ठी, १५ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप; अखेर 'हे' धक्कादायक कारण समोर

हरियाणाचे वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी मंगळवारी (दि. ७) चंदीगड येथील स्वतःच्या निवासस्थानी गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नऊ पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
IPS पूरन कुमार आत्महत्या प्रकरण : ९ पानी चिठ्ठी, १५ अधिकाऱ्यांवर छळाचे आरोप; अखेर 'हे' धक्कादायक कारण समोर
Published on

हरियाणाचे वरिष्ठ IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी मंगळवारी (दि. ७) चंदीगड येथील स्वतःच्या निवासस्थानी गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नऊ पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये पुरन कुमार यांनी १५ वरिष्ठ आणि निवृत्त अधिकाऱ्यांवर जातीय भेदभाव, मानसिक छळ आणि सार्वजनिक अपमान केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

पूरन कुमार यांनी मंगळवारी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या मुलीला ते तळघरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेवेळी त्यांच्या IAS पत्नी अमनीत पी. कुमार मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या नेतृत्वाखाली जपान दौऱ्यावर होत्या. घटनेनंतर अमनीत यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी म्हटलं, ही सामान्य आत्महत्या नाही. माझे पती अनुसूचित जातीतील अधिकारी होते. त्यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचा पद्धतशीर छळ केला. त्या अधिकाऱ्यांनी आपला पदसत्तेचा गैरवापर करून मानसिक त्रास दिला. त्यामुळेच माझ्या पतीसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

नोटमध्ये धक्कादायक आरोप

सुसाईड नोटमध्ये पूरन कुमार यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी नोटमध्ये लिहिले, की जातीय भेदभाव, सार्वजनिक अपमान आणि मानसिक छळाचा अनुभव मला २०२० मध्ये अंबाला पोलीस ठाण्यातील एका घटनेपासून सुरू झाला. तत्कालीन DGP मनोज यादव यांनी हा सिलसिला सुरू केला आणि आजही इतर वरिष्ठ अधिकारी त्याच पद्धतीने वागत आहेत.

वडिलांना शेवटचं भेटलो नाही - पूरन कुमार

त्यांनी पुढे लिहिले की, माझ्या वडिलांचा मृत्यू होत असताना मला अर्जित रजा मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे मी त्यांना शेवटचं भेटू शकलो नाही. या अन्यायाचा मला आजवर मानसिक त्रास होत आहे.

वरिष्ठांकडून जातिवाचक छळ

कुमार यांच्या नोटनुसार, सध्याचे DGP शत्रुजीत सिंग कपूर, तसेच IPS अधिकारी अमिताभ ढिल्लन आणि संजय कुमार यांच्याकडून त्यांचा सतत जातीय आणि मानसिक छळ होत होता. माझ्याविरुद्ध बनावट आणि खोट्या तक्रारी तयार केल्या जात होत्या. माझ्यासारख्या अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यांवर चालवला जाणारा हा सूडबुद्धीचा छळ आहे, असे त्यांनी स्पष्ट लिहिले.

त्यांनी पुढे म्हटलं, मी वारंवार वरिष्ठांकडे न्यायासाठी निवेदने दिली. मला फक्त समान वागणूक अपेक्षित होती. पण माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून त्या उलट माझ्याच विरोधात वापरल्या गेल्या.

मुलांना वडिलांच्या मृत्यूची उत्तरं हवी

मुख्यमंत्री नायब सैनी जपान दौऱ्यावरून परतले आहेत. IAS अधिकारी अमनीत कुमार यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली, की माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या अकस्मात मृत्यूबद्दल उत्तरं मिळायला हवीत. माझ्या पतीच्या दशकभराच्या सार्वजनिक सेवेचा सन्मान झाला पाहिजे, तो शांततेत दडपला जाऊ नये. तसेच, त्यांनी स्पष्ट केले, की जोपर्यंत त्यांच्या पतीने सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या लोकांविरुद्ध FIR दाखल होत नाही, तोपर्यंत त्या अंतिम संस्कार करणार नाहीत.

स्थानिक पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सुसाईड नोटमधील उल्लेखित वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. हरियाणा पोलिस मुख्यालयातही या घटनेने खळबळ उडाली असून, हरियाणा राज्य सरकारने याबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in