आयसिस पुणे स्लीपर मॉड्यूल प्रकरण : ३ लाखांचे बक्षीस असणाऱ्या दोन फरार दहशतवाद्यांना अखेर अटक

पुण्यातील आयईडी तयार करण्याच्या कटात सहभागी असलेल्या आणि दोन वर्षांपासून फरार असलेल्या आयसिसच्या स्लीपर मॉड्यूलमधील दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अखेर अटक केली आहे. आरोपी अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान यांना शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन ब्युरोने ताब्यात घेतले.
आयसिस पुणे स्लीपर मॉड्यूल प्रकरण : ३ लाखांचे बक्षीस असणाऱ्या दोन फरार दहशतवाद्यांना अखेर अटक
Published on

पुणे : पुण्यातील आयईडी तयार करण्याच्या कटात सहभागी असलेल्या आणि दोन वर्षांपासून फरार असलेल्या आयसिसच्या स्लीपर मॉड्यूलमधील दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अखेर अटक केली आहे. आरोपी अब्दुल्ला फैयाज शेख ऊर्फ डायपरवाला आणि तल्हा खान यांना शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन ब्युरोने ताब्यात घेतले. हे दोघे जकार्ता (इंडोनेशिया) येथून भारतात परतण्याचा प्रयत्न करत असताना ओळख पटल्याने अटक करण्यात आली.

एनआयएने दोघांवर प्रत्येकी ३ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले होते आणि त्यांच्याविरुद्ध एनआयएच्या विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. अटक केल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले आणि औपचारिकपणे अटक केली.

आयसिसचा कट आणि पुणे प्रकरणाचा तपशील

ही कारवाई २०२३ मध्ये नोंदवलेल्या आरसी-०५/२०२३/एनआयए/एमयूएम प्रकरणाशी संबंधित आहे. ज्यात पुण्यात आयसिसशी संबंधित स्लीपर मॉड्यूलद्वारे आयईडी तयार करण्याचा आणि चाचणी घेण्याचा कट उघड झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली होती, जे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

एनआयएच्या मते, या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य भारतात इस्लामिक स्टेट (IS) स्थापण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत होते. "भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारून देशात हिंसाचार व सांप्रदायिक तणाव निर्माण करून आयसिसचा अजेंडा पुढे नेण्याचा उद्देश यामागे होता," असे एनआयएच्या निवेदनात म्हटले आहे.

कोंढव्यात बॉम्ब तयार, प्रशिक्षण आणि चाचण्या

एनआयएच्या तपासात उघड झाले आहे की अटक करण्यात आलेले शेख आणि खान यांनी पुण्यातील कोंढवा परिसरात भाड्याने घेतलेल्या घरात इतर साथीदारांच्या मदतीने आयईडी तयार करण्याचे प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. २०२२-२३ दरम्यान, त्यांनी नियंत्रणाखाली स्फोट करून आयईडीची चाचणी देखील घेतली होती.

या कारवायांमध्ये सहभागी इतर आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, अकीफ नाचन आणि शाहनवाज आलम.

कायदेशीर कारवाई आणि पुढील तपास

एनआयएने या प्रकरणात UAPA (अनलॉफुल अ‍ॅक्टिविटीज प्रिव्हेन्शन अ‍ॅक्ट), स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्र कायदा, तसेच आयपीसीच्या विविध कलमांखाली सर्व १० आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. तपास संस्थेने याप्रकरणात आणखी काही सहकारी वा आंतरराष्ट्रीय संपर्क असल्याचा संशय व्यक्त केला असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in