

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांनी सावधगिरीचे धोरण अवलंबले आहे. ऊर्जा बचतीसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ‘हायब्रिड’ कामाच्या मॉडेलला प्राधान्य दिले आहे.
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख संघटना ‘नॅसकॉम’ने सोमवारी या संदर्भात माहिती दिली. आखातातील भू-राजकीय परिस्थिती सातत्याने बदलत असून, त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे संघटनेने नमूद केले.
संस्थेने सांगितले की, चालू असलेल्या तणावामुळे कंपन्यांनी आपल्या कॅम्पसमध्ये ऊर्जा व्यवस्थापनाचे कडक उपाय लागू केले आहेत. यात अनावश्यक ऊर्जेचा वापर कमी करणे, निवडक सुविधा सेवांचे सुसूत्रीकरण करणे आणि जिथे शक्य असेल तिथे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देणे समाविष्ट आहे. यामुळे ऊर्जेच्या एकूण वापरात घट होण्यासोबतच कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा वेळ आणि खर्चही वाचणार आहे. सध्या हे क्षेत्र हायब्रिड मॉडेलवर कार्यरत असून, ग्राहकांच्या गरजा आणि कामाच्या स्वरूपानुसार यामध्ये बदल केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रविवारी हैदराबाद येथील एका सभेत बोलताना नागरिकांना या संकटावर मात करण्यासाठी काही उपाय सुचवले होते. यात पेट्रोल आणि डिझेलचा जपून वापर करणे, मेट्रो रेल्वेचा वापर, कारपूलिंग आणि ई-वाहनांना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. परकीय चलन वाचवण्यासाठी घरून काम करण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना काळात आपण आभासी बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काम करण्याची सवय लावून घेतली आहे, ती आता पुन्हा सुरू करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मोदी यांनी नमूद केले. ‘नॅसकॉम’ ही ३,५०० हून अधिक सदस्य कंपन्यांची संघटना असून, ती ३१५ अब्ज डॉलरच्या भारतीय तंत्रज्ञान उद्योगाचे प्रतिनिधित्व करते.