आंध्र प्रदेश ते थेट नासा! जान्हवी डांगेटी २०२९ मध्ये घेणार अंतराळात झेप; नासा प्रोग्राम पूर्ण करणारी ठरली पहिली भारतीय तरुणी

भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या महिलांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पलाकोल्लू या छोट्याशा गावातून आलेली जान्हवी डांगेटी ही तरुणी २०२९ मध्ये अंतराळ प्रवास करणार असून ती नासाच्या प्रतिष्ठित ‘इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅम’(IASP) पूर्ण करणारी पहिली भारतीय ठरली आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत गौरवास्पद आहे.
आंध्र प्रदेश ते थेट नासा! जान्हवी डांगेटी २०२९ मध्ये घेणार अंतराळात झेप; नासा प्रोग्राम पूर्ण करणारी ठरली पहिली भारतीय तरुणी
Published on

भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या महिलांच्या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पलाकोल्लू या छोट्याशा गावातून आलेली जान्हवी डांगेटी ही तरुणी २०२९ मध्ये अंतराळ प्रवास करणार असून ती नासाच्या प्रतिष्ठित ‘इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्रॅम’(IASP) पूर्ण करणारी पहिली भारतीय ठरली आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत गौरवास्पद आहे.

चंद्र आपला पाठलाग करत असल्याचा भास -

जान्हवी अंतराळ क्षेत्राबाबत बालपणापासूनच उत्सुक होती. तिला लहानपणी चंद्र आपला पाठलाग करत असल्याचा भास व्हायचा आणि आज तीच जिज्ञासा तिला अंतराळ प्रवासाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन आली आहे.

जान्हवीने आपल्या गावी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पंजाबमधील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंग शाखेत पदवी प्राप्त केली. याशिवाय तिने AATC पोलंड, Geospace आयसलँड आणि Project PoSSUM येथे अंतराळवीर प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. ती STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) शिक्षिका असून अनेक NIT आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानंही देत असते. तसेच ती ॲडव्हान्स्ड अ‍ॅडव्हेंचर स्कुबा डायव्हर देखील आहे.

पुढील चार वर्षांत जाणार अंतराळात -

जान्हवीची निवड अमेरिकेच्या आगामी ‘टायटन ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशन’ या अंतराळ प्रकल्पासाठी झाली असून हा प्रकल्प पुढील चार वर्षांत प्रक्षेपित होणार आहे. जान्हवी या मोहिमेसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला आहे. अंतराळ विज्ञानातील तिच्या योगदानाबद्दल तिला NASA, ISRO आणि Space Iceland या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

भारतातील सर्वात तरुण Analog Astronaut -

जान्हवी Analog Astronaut म्हणून देखील कार्यरत आहे. तिने अनेक analog अंतराळ मोहिमांमध्ये, खोल समुद्रातील संशोधन प्रकल्पांमध्ये आणि भूगर्भशास्त्र विषयक प्रशिक्षणांमध्ये सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय खगोलीय शोध उपक्रमात सहभागी होऊन तिने Pan-STARRS या प्रगत दुर्बिणीद्वारे मिळालेल्या डेटावरून एका लघुग्रहाचा शोध लावला होता. तिच्या या यशामुळे ती भारतातील सर्वात तरुण Analog Astronaut बनली आहे.

जान्हवीने याबाबत माहिती देताना म्हंटले, की आमचा पहिला कक्षीय (orbital) अंतराळप्रवास २०२९ मध्ये होणार आहे. या ऐतिहासिक मोहिमेचं नेतृत्व NASA चे माजी अंतराळवीर आणि अमेरिकन लष्कराचे निवृत्त कर्नल विल्यम मॅकआर्थर ज्युनिअर करणार आहेत. जे सध्या टायटन स्पेसचे मुख्य अंतराळवीर (Chief Astronaut) आहेत.''

तर पुढे तिने सांगितले, की ''२०२६ पासून माझं संपूर्ण अंतराळवीर प्रशिक्षण सुरू होणार आहे, ज्यात यानप्रणालींचं सखोल ज्ञान, मोहिमांची सिम्युलेशन, झिरो ग्रॅव्हिटी फ्लाइट्स, आपत्कालीन प्रक्रिया, मानसिक व शारीरिक परीक्षणं आणि अंतराळ मोहिमांची व्यवस्थापन यांचा समावेश असेल. या प्रक्रियेद्वारे शिकणं, विकसित होणं आणि आगामी अंतराळ युगात योगदान देणं यासाठी मी उत्सुक आहे.'' तिने या निवडीसाठी Titans Space Industries Inc. आणि नील एस. लॅचमन यांचे आभार मानले आहेत.

जान्हवीचे वडील श्रीनिवास आणि आई पद्मश्री सध्या कुवेतमध्ये कार्यरत आहेत. भारतातल्या एका लहानशा गावातून जान्हवी थेट अंतराळात जाणार असल्याने भारतीयांसाठीही अभिमानाची बाब आहे.

logo
marathi.freepressjournal.in