

जयपूरमध्ये भररस्त्यात दुचाकीवरून जात असलेल्या एका महिलेशी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.
VIDEO मध्ये नेमकं काय दिसतं?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दुचाकीवरून आलेले युवक एका महिलेला सतत पाठलाग करताना दिसतात. महिला स्वतःच्या दुचाकीवरून जात असताना आरोपी तिच्या अगदी जवळ येत अयोग्य स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. एका क्षणी तिचा शर्ट ओढण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसतं. भररस्त्यात घडलेला हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.
व्हायरल व्हिडिओ पाहा
व्हायरल VIDEO नंतर पोलिसांची तातडीची कारवाई
हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर जयपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सुमारे ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. सायबर सेल आणि नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) च्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मनराज मीणा (२४), सुदामा मीणा (२४), महेश बंजारा (१९) आणि लोकेश बंजारा (२१) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अटक टाळण्यासाठी आपली ओळख आणि रूप बदलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांना शोधून काढण्यात आलं.
‘रील्स’च्या नादात कायदा विसरू नका – पोलिसांचा इशारा
या घटनेनंतर राजस्थान पोलिसांनी सोशल मीडियावरून स्पष्ट इशारा दिला आहे. “रील्सच्या नादात ‘खरा’ कायदा विसरू नका,” असं म्हणत त्यांनी नागरिकांना सावध केलं आहे. तसेच, सोशल मीडिया टीम २४x७ सतर्क असून प्रत्येक संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवत असल्याचंही पोलिसांनी नमूद केलं.
पोलिसांनी पुढे म्हटलं आहे की, “तंत्रज्ञान आणि माहितीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली आहे. कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही.” याशिवाय, केवळ व्हायरल होण्यासाठी वाहतूक नियम किंवा सार्वजनिक सुरक्षेशी छेडछाड करू नका, असा इशाराही देण्यात आला आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियासाठी धोकादायक स्टंट किंवा वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत पोलिसांनी नागरिकांना जबाबदारीने वागण्याचं आवाहन केलं आहे.