

जम्मू: जम्मू-काश्मीरच्या पूंछ आणि राजौरी या दोन्ही सीमावर्ती जिल्ह्यांत रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून अन्य सात जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेनंतर अनेक यंत्रणांच्या माध्यमातून युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. या पुरात २५० हून अधिक गाडया वाहून गेल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूंछ जिल्ह्यातील सुरणकोट तहसीलमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले आहे. बहुतांश मृत्यू याच भागात झाले आहेत. सतत सुरू असलेला पाऊस आणि खराब रस्त्यांमुळे बचाव पथकांच्या कार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी पहाटे मुसळधार पावसामुळे सुरनकोटमधील लोअर मुराह गावात भूस्खलन होऊन एक घर कोसळले. यामध्ये घरातील सर्व आठ जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले. ढिगाऱ्यातून सोफियान यासार या दोन वर्षांच्या चिमुरड्याच्या मृतदेहासह पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, उर्वरित बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सांगला गावात अचानक आलेल्या पुरात घर वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये अब्दुल हमीद, त्यांची पत्नी शरीफा बेगम, मुलगी अरीबा आणि बहीण मनिरा बेगम यांचा समावेश आहे.
पूंछ जिल्ह्यातील हवेली तहसीलमध्ये घरे कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरी एक जण गंभीर जखमी झाली आहे. राजौरी शहरातून वाहणाऱ्या नदीतून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने किनाऱ्यावरील सुरक्षा भिंती किंवा बंधारे फुटले, ज्यामुळे डझनभर वाहने वाहून गेली किंवा पाण्यात बुडाली. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.