
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील ढगफुटीची घटना ताजी असतानाच कठुआ जिल्ह्यात रविवारी पहाटे ढगफुटी आणि भूस्खलनाची घटना घडली. यामध्ये किमान ७ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
कुठे घडल्या घटना?
शनिवारी मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजबागमधील जोड घाटी गावात ढगफुटी झाली. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले. दुसरीकडे, जंगलोट परिसरात पावसामुळे झालेल्या भूस्खलनात २ जणांचा मृत्यू झाला. जोड घाटी गावात ढगफुटीमुळे संपर्क तुटला असून काही घरांचे नुकसान झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कठुआ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बागर्ड आणि चांगडा गावे तसेच लखनपूर पोलिस स्टेशनअंतर्गत दिलवान-हुटली भागातही भूस्खलन झाले. मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नाही.
पोलिस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि स्थानिक स्वयंसेवक संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत. कठुआचे जिल्हा विकास आयुक्त राजेश शर्मा, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि प्रशासनातील इतर अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन बचाव व मदत कार्याचे निरीक्षण केले.
मुसळधार पावसामुळे जलसाठ्यांची पातळी झपाट्याने वाढली असून उझ नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आणि शोकाकुल कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच बाधित कुटुंबांसाठी तातडीने मदत, बचाव आणि स्थलांतर उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीदेखील या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, नागरी प्रशासन, लष्कर आणि निमलष्करी दल बचाव व मदत कार्यात सक्रियपणे सहभागी झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी किश्तवाडमध्येही ढगफुटी
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात ढगफुटीची घटना घडली होती, ज्यात सुमारे ६५ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कठुआ जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगफुटीमुळे मोठी हानी झाली आहे.