Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

भारद्वाजला शनिवारी दुपारी सुमारे २ वाजता अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ प्रताप सिंह लालेर यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले.
Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी
Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी (Photo-X)
Published on

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान एका व्यक्तीवर कथित हल्ला केल्याप्रकरणी इन्फ्लुएन्सर स्वतंत्र भारद्वाजला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला शनिवारी (दि. ५) न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पोलिसांनी लावलेल्या वाढीव कलमांसह रिमांडच्या मागणीवर भारद्वाजच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

न्यायाधीशांच्या निवासस्थानी हजर

माहितीनुसार, भारद्वाजला शनिवारी दुपारी सुमारे २ वाजता अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ प्रताप सिंह लालेर यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले. त्याच्या विधि सहाय्य वकिलांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर बाजू मांडली. यापूर्वी त्याला पटियाला हाऊस न्यायालयात प्रत्यक्ष हजर केले जाणार होते.

जंतरमंतरवरील आंदोलनात कथित हल्ला

जंतरमंतरवर 'कॉकरोच जनता पार्टी'च्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान निशू आझाद या विद्यार्थीनीचे वडील संजय कुमार यांच्या डोक्यावर लोखंडी कड्याने प्रहार केल्याचा आरोप स्वतंत्र भारद्वाजवर आहे. या घटनेनंतर भारद्वाजच्या एका पॉडकास्टमधील वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी सीजेपीच्या प्रतिनिधींसह खासदार चंद्रशेखर आझाद आणि काँग्रेसच्या विधी पथकाने संसद मार्ग पोलीस ठाण्यात आंदोलन केले होते. भारद्वाजविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह कठोर कलमांन्वये कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

बुलंदशहरमध्ये घेतले ताब्यात

कॉकरोच जनता पार्टीने (CJP) संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर भारद्वाजच्या अटकेची मागणी करत आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर काही तासांतच शुक्रवारी भारद्वाजला बुलंदशहर येथे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

एफआयआरमध्ये एससी/एसटी कायद्याची कलमे

दिल्ली पोलिसांनी भारद्वाजविरोधातील एफआयआरमध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यातील तरतुदी तसेच गुन्हेगारी धमकीचे कलम जोडल्याचे वृत्त आहे. त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पॉडकास्ट मुलाखतीनंतर कारवाई

भारद्वाजच्या पॉडकास्ट मुलाखतीनंतर त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यात २० जुलैच्या आंदोलनादरम्यान संबंधित व्यक्तीच्या वडिलांचे डोकं फोडल्याचा आणि राजकीय संबंधांमुळे अटकेपासून वाचल्याचा दावा त्याने केल्याचे वृत्त आहे.

मात्र, दिल्ली पोलिसांनी यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या जखमा गंभीर नसल्याचे आणि त्या स्टीलच्या कड्यामुळे झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर भारद्वाजने आपण स्वसंरक्षणासाठी कृती केल्याचा दावा केला होता.

अल्पवयीन आंदोलकाच्या तक्रारीवरून पॉक्सोचा गुन्हा

अल्पवयीन तरुणीने ऑनलाइन धमक्या आणि छळाबाबत केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत स्वतंत्र एफआयआर दाखल केला आहे. वडिलांवरील कथित हल्ल्याविरोधात आवाज उठवल्यानंतर आणि पोलिसांत तक्रार केल्यानंतर आपल्याला बलात्काराच्या धमक्या, शिवीगाळ आणि मॉर्फ केलेली छायाचित्रे पाठवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.

सीजेपीच्या शिष्टमंडळाची पोलिसांशी बैठक

सीजेपीच्या प्रतिनिधींची संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या शिष्टमंडळासोबत आझाद समाज पार्टीचे प्रमुख आणि नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आझादही उपस्थित होते.

या शिष्टमंडळाने कथित हल्ल्याच्या प्रकरणात खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी धमकी आणि एससी/एसटी कायद्याच्या तरतुदी जोडण्याची मागणी केली. तसेच अल्पवयीन कार्यकर्तीला मिळालेल्या कथित बलात्काराच्या धमक्या आणि ऑनलाइन छळाबाबत स्वतंत्र एफआयआर नोंदवण्याची मागणीही करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी स्वतंत्र भारद्वाजला अटक केली असून, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in