

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी (दि. ३०) न्यायमूर्ती सूर्यकांत यांची देशाचे ५३ वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून नियुक्ती केली आहे. केंद्रीय न्याय विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर २०२५ रोजी औपचारिकपणे पदभार स्वीकारतील.
सध्याचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई हे २३ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. परंपरेनुसार, कार्यरत सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करतात आणि त्यानुसार गवई यांनी आपल्या शिफारसीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे नाव सुचवले होते.
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘X’ वर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, “भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून, राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या कार्यकाळासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा प्रवास
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथे झाला. त्यांनी १९८४ मध्ये महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक येथून कायद्याची पदवी घेतली आणि त्याच वर्षी हिसार जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली.
लवकरच त्यांनी आपले कार्यक्षेत्र चंदीगडकडे वळवले आणि पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. संवैधानिक, सेवा, आणि दिवाणी विषयातील त्यांच्या सखोल अभ्यासामुळे ते कायदेशीर वर्तुळात लवकरच ओळखले जाऊ लागले. १९८५ ते २००० या काळात त्यांच्या कायदेविषयक कामगिरीमुळे त्यांना हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता (Advocate General) म्हणून नेमण्यात आले.
७ जुलै २००० रोजी त्यांनी हा मान मिळवला आणि २००४ मध्ये त्यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
त्यानंतर २०१८ मध्ये त्यांना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले. त्यांच्या न्यायदानातील सखोलता आणि प्रामाणिक दृष्टिकोन लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मे २०१९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीची शिफारस केली. त्या महिन्यातच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
संतुलित आणि संवेदनशील न्यायिक दृष्टिकोन
न्यायमूर्ती सूर्यकांत हे त्यांच्या संतुलित विचारसरणी, संविधानिक मूल्यांवरील निष्ठा आणि समाजातील वंचित घटकांबद्दलच्या संवेदनशील दृष्टिकोनासाठी ओळखले जातात. त्यांनी दिलेल्या अनेक निकालांमध्ये मानवी अधिकारांचे रक्षण आणि संविधानाच्या आत्म्याचे पालन हा ध्यास स्पष्टपणे दिसतो.
न्यायमूर्ती सूर्यकांत हे ९ फेब्रुवारी २०२७ रोजी निवृत्त होतील. म्हणजेच, त्यांचा कार्यकाळ सुमारे एक वर्षे आणि अडीच महिने एवढा असेल. या काळात देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचे घटनात्मक आणि सामाजिक विषय हाताळले जाण्याची अपेक्षा आहे.