सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

सोशल मीडियावर सोन्याचे दागिने, रोकड आणि कुटुंबाच्या बाहेर जाण्याचे अपडेट्स शेअर करणं कन्याकुमारीतील इन्फ्लुएन्सर मधुमिताला महागात पडलं. तिच्या Reel वर नजर ठेवून चोरट्यांनी घरातून सुमारे १ कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला.
सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास
सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास
Published on: 

आजच्या सोशल मीडियाच्या जगात रोजच्या आयुष्यात काय सुरू आहे, कुठे फिरायला गेलो, काय खरेदी केलं, याची Reel बनवून शेअर करणं अनेकांच्या आयुष्याचा भाग बनलं आहे. विशेषतः सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आपल्या प्रत्येक अपडेटची झलक फॉलोअर्ससोबत शेअर करताना दिसतात. मात्र, हीच सवय एका इन्फ्लुएन्सरला चांगलीच महागात पडली. कन्याकुमारीतील यूट्यूब आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर मधुमिता सोशल मीडियावर सोन्याचे दागिने, घरातील रोकड आणि कुटुंबाच्या बाहेर जाण्याचे अपडेट्स VIDEO मधून शेअर करायची. तिच्या याच पोस्टवर चोरट्यांची नजर पडली. मधुमिता कुटुंबासोबत खरेदीसाठी घराबाहेर पडताच चोरट्यांनी संधी साधली आणि तिच्या घरातून सुमारे १ कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला.

सोशल मीडियावर श्रीमंतीचं प्रदर्शन

मधुमिता ही कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोईलजवळील परिसरात पती विनोद कुमार आणि कुटुंबासोबत राहते. विनोद कुमार व्यावसायिक आहेत. मधुमिता सोशल मीडियावर सक्रिय असून, तिच्या अनेक रिल्स आणि पोस्टमध्ये ती घरातील सोन्याचे दागिने दाखवायची. इतकंच नाही, तर गादीवर ठेवलेली नोटांची बंडलं आणि आपल्या मुलावर नोटांचा वर्षाव करतानाचे व्हिडीओही तिने पोस्ट केले होते.

दर महिन्याला सोने खरेदी करत असल्याचे व्हिडीओही तिने शेअर केले होते. याशिवाय कुटुंब कुठे जाणार आहे, कोणत्या कामासाठी बाहेर पडणार आहे, याची माहितीही तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून मिळत होती.

कुटुंब खरेदीला गेलं अन् चोरट्यांनी साधली संधी

गुरुवारी संध्याकाळी मधुमिता कुटुंबियांसोबत कपड्यांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडली होती. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर तिला चोरी झाल्याचे लक्षात आले. बेडरूममधील कपाट फोडलेले होते आणि त्यातील मौल्यवान वस्तू गायब होत्या.

चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.

१२० तोळे सोने, हिऱ्यांचे दागिने लंपास

चोरट्यांनी घरातून १२० सोव्हरिन सोन्याचे दागिने, हिऱ्यांचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. चोरी झालेल्या ऐवजाची एकूण किंमत सुमारे १ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोशल मीडिया पोस्ट पाहून चोरीचा कट?

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मधुमिताच्या सोशल मीडिया अकाउंटकडेही लक्ष वळवले आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मधुमिताच्या पोस्टमधून घरातील मौल्यवान वस्तूंसह कुटुंबाच्या हालचालींचीही माहिती मिळत होती.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चोरट्यांनी मधुमिताच्या रिल्सवर नजर ठेवली आणि कुटुंब घराबाहेर गेल्याची संधी साधून चोरी केली असावी.

चोरट्यांच्या शोधासाठी ५ विशेष पथके

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in