कर्नाटक : रुग्णालयात आजारी नातेवाइकाची काळजी घेण्यासाठी थांबलेल्या एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णाच्या शेजारी जमिनीवर झोपलेल्या महिलेजवळ एक अनोळखी व्यक्ती आली. झोपेचं सोंग घेत त्याने महिलेच्या अंगावरील चादर ओढली आणि तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. मात्र, महिलेला जाग येताच तिने त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावली. आरडाओरडा ऐकून इतर लोकही मदतीला धावले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्या तावडीतून निसटला. कर्नाटकातील हावेरी जिल्हा रुग्णालयात घडलेला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मध्यरात्री रुग्णालयात नेमकं काय घडलं?
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, शनिवारी (२१ नोव्हेंबर) पहाटे सुमारे २ वाजता ही घटना घडली. हावेरी जिल्हा रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये रुग्णांसोबत आलेले नातेवाईक झोपले होते. त्याच ठिकाणी एक महिला रुग्णाच्या शेजारी जमिनीवर झोपली होती.
यावेळी एक अनोळखी व्यक्ती वॉर्डमध्ये शिरली. त्याने महिलेजवळ जाऊन झोपल्याचं सोंग घेतलं. त्यानंतर तिच्या अंगावरील चादर ओढली आणि तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. हा प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
जाग येताच महिलेने लगावली कानशिलात
महिलेला चुकीचा स्पर्श होत असल्याचं जाणवताच ती अचानक जागी झाली. समोर घडत असलेला प्रकार लक्षात येताच तिने संबंधित व्यक्तीला विरोध केला आणि थेट त्याच्या कानशिलात लगावली. महिलेने आरडाओरडा केल्यामुळे वॉर्डमधील इतर लोकही जागे झाले. त्यांनी तातडीने तिच्या मदतीसाठी धाव घेतली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयात गोंधळ उडाला.
लोकांनी पकडलं, तरीही आरोपी पळून गेला
महिलेने विरोध केल्यानंतर संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याची कॉलर पकडली आणि त्याला खाली पाडून रोखण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. तरीही झटापटीदरम्यान तो त्यांच्या तावडीतून सुटला आणि रुग्णालयातून पळून गेला.
पाहा व्हिडिओ
१० मोबाईल चोरीच्या प्रकरणातही संशय
या घटनेतील संशयित व्यक्तीवर रुग्णालयातील मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचाही संशय आहे. गेल्या आठवड्यात हावेरी जिल्हा रुग्णालयातून किमान १० मोबाईल चोरीला गेल्याची माहिती आहे. या चोऱ्यांमागेही संबंधित व्यक्ती असू शकते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग असल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे हावेरी जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्ती रुग्णांच्या वॉर्डमध्ये कशी शिरली, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटवून त्याला तातडीने पकडावं आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी रुग्णालयातील सुरक्षा अधिक कडक करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.