करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात शनिवारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृतांची संख्या वाढली असून ३९ वर पोहोचली आहे. तर, अजूनही ६७ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तामिळनाडूचे आरोग्य सचिव पी. सेंथिल कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश
Published on

तामिळनाडूच्या करूर जिल्ह्यात शनिवारी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत मृतांची संख्या वाढली असून ३९ वर पोहोचली आहे. तर, अजूनही ६७ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तामिळनाडूचे आरोग्य सचिव पी. सेंथिल कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मृतांमध्ये महिला व मुलांचाही समावेश

या घटनेत एकूण ३९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १७ महिला, १३ पुरुष, ४ मुले आणि ५ वृद्ध महिला यांचा समावेश आहे. मृतांपैकी ३० जणांचे शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले असून त्यांचे मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

जखमींची स्थिती

२६ जखमींना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६७ रुग्णांपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. एका रुग्णाला पुढील उपचारांसाठी मदुराई जीएच येथे हलवण्यात आले आहे. इतर जखमी स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

तपास समिती नियुक्तीचे आदेश

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घटनेची माहिती घेतली असून ते करूरला जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांशी फोनवरून चर्चा केली आहे.

विजय थलापतींची मदत जाहीर

घटनेवर दु:ख व्यक्त करत विजय थलापती यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख रुपये आणि जखमींना २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. “तुमचे नुकसान कधीही भरून न निघणारे आहे, पण या क्षणी तुमच्या सोबत उभे राहणे माझे कर्तव्य आहे,” असे विजय यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींना सर्वतोपरी मदत करतील, असेही त्यांनी आश्वासन दिले.

नेमकं काय घडलं?

शनिवारी अभिनेता-राजकारणी विजय थलापती यांच्या ‘तामिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाच्या करूर येथे आयोजित रॅलीत हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. विजय भाषण करत असतानाच अचानक चेंगराचेंगरी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in