
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आमदार मोठ्या आर्थिक घोटाळ्यांमुळे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कक्षेत येत आहेत. चित्रदुर्गचे आमदार के.सी. वीरेंद्र यांना ED ने सिक्कीममधून अटक केली असून त्यांच्यावर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजीचे गंभीर आरोप आहेत.
शुक्रवारी ED ने वीरेंद्र यांच्या काही ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईत तब्बल १२ कोटी रुपये रोख, ६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, एक कोटी रुपयांचे परकीय चलन आणि चार वाहने जप्त करण्यात आली. तपास यंत्रणेला अनेक महत्त्वाची कागदपत्रे व रेकॉर्ड देखील सापडले आहेत.
५ कॅसिनोमध्ये सहभाग
चित्रदुर्ग विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले वीरेंद्र हे गोव्यातील कॅसिनो व्यवसायाशी जोडलेले असल्याची माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध पपीज कॅसिनोसह एकूण ५ कॅसिनोंमध्ये त्यांचा थेट सहभाग असल्याचे सांगितले जाते. यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.
कर्नाटकात २ काँग्रेस आमदार ED च्या रडारवर
कर्नाटकात गेल्या आठ दिवसांत दोन काँग्रेस आमदारांवर ED ची कारवाई झाली आहे. यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी ईडीने उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवारचे काँग्रेस आमदार सतीश कृष्ण साईल यांच्या घरावर छापे टाकले होते. त्यावेळी त्यांच्या घरातून १.४१ कोटी रुपये रोख, ६.७५ किलो सोने आणि बँक खात्यांमधील तब्बल १४.१३ कोटी रुपयांच्या ठेवी जप्त करण्यात आल्या होत्या.
सतीश साईल यांच्यावर २०१० मध्ये बेकायदेशीर लोहखनिज निर्यात प्रकरणी आरोप आहेत. बेलकेरी बंदरातून सुमारे १.२५ लाख मेट्रिक टन लोहखनिज परदेशात पाठवण्यात आल्याचे समोर आले असून त्याची किंमत जवळपास ८६.७८ कोटी रुपये असल्याचा तपासात निष्कर्ष आहे.
गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या दोन आमदारांवर ED ची कारवाई झाल्यामुळे कर्नाटक काँग्रेस अडचणीत आली आहे. एकीकडे सट्टेबाजी आणि कॅसिनो व्यवसायातील गैरव्यवहार तर दुसरीकडे लोहखनिज निर्यातीतील अनियमितता, या दोन्ही प्रकरणांमुळे पक्षावर दबाव वाढला आहे.