चारधाम यात्रेदरम्यान केदारनाथमध्ये कोसळले हेलिकॉप्टर; २ वर्षांच्या चिमुकलीसह ७ जणांचा मृत्यू

देशात अहमदाबाद विमान अपघाताची घटना ताजी असतानाच उत्तराखंडमधील केदारनाथ धामहून गुप्तकाशीला येणारे आर्यन एव्हीएशनचे हेलिकॉप्टर VTBKA/BELL ४०७ हे गौरीकुंड परिसरात कोसळले. चारधाम यात्रेदरम्यान हा मोठा अपघात घडला. या दुर्दैवी अपघातात २ वर्षांच्या चिमुकलीसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.
चारधाम यात्रेदरम्यान केदारनाथमध्ये कोसळले हेलिकॉप्टर; २ वर्षांच्या चिमुकलीसह ७ जणांचा मृत्यू
Published on

देशात अहमदाबाद विमान अपघाताची घटना ताजी असतानाच उत्तराखंडमधील केदारनाथ धामहून गुप्तकाशीला येणारे आर्यन एव्हीएशनचे हेलिकॉप्टर VTBKA/BELL ४०७ हे गौरीकुंड परिसरात कोसळले. चारधाम यात्रेदरम्यान हा मोठा अपघात घडला. या दुर्दैवी अपघातात २ वर्षांच्या चिमुकलीसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. गौरीकुंड येथे गवत कापणाऱ्या एका नेपाळी वंशाच्या महिलेने या अपघाताची माहिती दिली. पुढील आदेश येईपर्यंत हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे.

रविवारी (१५ जून) पहाटे ५.३० वाजता केदारनाथ मार्गावर श्री केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जाणारे हे हेलिकॉप्टर गौरीकुंडपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या गौरी माई खार्क येथे कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, खराब वातावरणामुळे आणि धुक्यांमुळे कॅप्टनचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सूटले आणि हा अपघात झाला.

महाराष्ट्रातील चिमुकलीचाही मृत्यू -

या दुर्घटनेत कॅप्टन राजबीर सिंग चौहान (३९ वर्ष), बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे प्रतिनिधी आणि रासी येथील रहिवासी विक्रम रावत (४७ वर्ष), उत्तर प्रदेशातील रहिवासी विनोद देवी (६६ वर्ष), तृष्टी सिंग (१९ वर्ष), गुजरातमधील रहिवासी राजकुमार सुरेश जयस्वाल (४१ वर्ष), महाराष्ट्रातील यवतमाळ येथील रहिवासी श्रद्धा राजकुमार जयस्वाल आणि काशी (२ वर्ष) अशा सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

एसडीआरएफ कमांडर अर्पण यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव पथके तात्काळ रवाना करण्यात आली. घटनास्थळ अतिशय दुर्गम आणि घनदाट जंगलात होते, जिथे एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकांनी जलद आणि समन्वित बचाव कार्य हाती घेतले आहे.

हेलिकॉप्टर शटल सेवा बंद -

उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विभागाच्या (यूसीएडीए) मुख्य कार्यकारी अधिकारी सोनिका यांनी सांगितले की, खोऱ्यात सुरू असलेल्या मदतकार्य आणि हवामान परिस्थितीमुळे परिसरातील हेलिकॉप्टर शटल सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

या हेलिकॉप्टर अपघातानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मुख्यमंत्री निवासस्थानातून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत व्हर्च्युअल उच्चस्तरीय बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत राज्याचे मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन सचिव, युसीएडीएचे सीईओ, आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेल्या सहा महिन्यातील चौथी घटना -

मे २०२५ पासून हेलिकॉप्टर अपघाताची ही चौथी घटना आहे. ८ मे रोजी गंगणी येथील भागीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर, १७ मे रोजी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये एअर अॅम्ब्युलन्स हेलिकॉप्टर कोसळले होते. यामध्ये डॉक्टर, नर्स आणि पायलट प्रवास करत होते. परंतु, हे तिघेही सुदैवाने बचावले. तर रुद्रप्रयाग येथे ७ जून रोजी एक हेलिकॉप्टर आपत्कालीन लँड करण्यात आले. लँड करताना हेलिकॉप्टरचा मागील भाग कारवर पडल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे महामार्गावरील पत्र्याचे शेड उडाले. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांना दुखापत झाली होती.

logo
marathi.freepressjournal.in