शरीरावर ९१ जखमा, ७ बरगड्या मोडल्या; दीड वर्षांच्या चिमुकल्यावर आईच्या लिव्ह-इन पार्टनरकडून अमानुष अत्याचार

केरळमध्ये १८ महिन्यांच्या अर्शिद या चिमुकल्याच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. शवविच्छेदन अहवालात शरीरावर ९१ जखमा, सात मोडलेल्या बरगड्या आणि अमानुष छळाच्या खुणा आढळून आल्या आहेत. आईच्या लिव्ह-इन पार्टनरवर गंभीर आरोप असून पोलिस तपास सुरू आहे.
शरीरावर ९१ जखमा, ७ बरगड्या मोडल्या; दीड वर्षांच्या चिमुकल्यावर आईच्या लिव्ह-इन पार्टनरकडून अमानुष अत्याचार
Published on

केरळमधील तिरुवनंतपुरम येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आईच्या लिव्ह-इन पार्टनरने दीड वर्षांच्या चिमुकल्याचा अमानुष छळ करून त्याचा जीव घेतल्याचा आरोप आहे. शवविच्छेदन अहवालात मुलाच्या शरीरावर तब्बल ९१ जखमा, सात मोडलेल्या बरगड्या, डोक्यात रक्तस्राव आणि अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाल्याचे उघड झाले आहे.

मृत चिमुकल्याचे नाव अर्शिद असून तो अवघा दीड वर्षांचा होता. तिरुवनंतपुरमपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील नेदुमंगड येथील पनवूर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाची आई अखिला आणि तिचा लिव्ह-इन पार्टनर अश्कर यांना अटक केली आहे.

शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती

शवविच्छेदन अहवालानुसार, अर्शिदच्या सात बरगड्या मोडल्या होत्या. त्याच्या डोक्यात सूज आणि रक्तस्राव झाला होता. तसेच अंतर्गत अवयवांनाही गंभीर इजा झाल्याचे आढळून आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अश्कारने मुलाच्या छातीवर पाय ठेवल्याने त्याच्या बरगड्या मोडल्या असाव्यात. त्यामुळे अंतर्गत अवयवांनाही नुकसान झाले. अहवालात मुलाच्या गुप्तांगांवर आणि उजव्या पायाच्या तळव्यावर भाजल्याच्या खुणाही आढळून आल्या आहेत. या जखमा सिगारेट लायटरने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या मते, मुलावर सातत्याने अत्याचार करण्यात येत होते. त्याच्या शरीरावरील जखमांवरून दीर्घकाळ छळ करण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

महिनाभरापासून सुरू होता छळ

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मृत्यूपूर्वी जवळपास महिनाभर अर्शिदच्या दोन्ही हातांना फ्रॅक्चर झाले होते. त्यावेळी मुलगा सायकलवरून पडल्याने जखमी झाल्याचे अश्कार शेजाऱ्यांना सांगत होता.

मात्र मुलाच्या आजी-आजोबांना त्याच्यावर अत्याचार होत असल्याचा संशय होता. त्यांनी मुलाचा ताबा मिळावा यासाठी प्रयत्नही केले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी मुलाला आईसोबतच राहण्याची परवानगी दिली होती.

मुलाला आयुष्यातील अडथळा समजत होता

पोलिस चौकशीत अश्कारने धक्कादायक कबुली दिली आहे. अर्शिद हा त्याच्या आणि अखिला यांच्या नात्यातील अडथळा असल्याचे त्याला वाटत होते.

२९ मे रोजी मुलगा मोठ्याने रडत असल्याने संतापलेल्या अश्करने त्याच्या डोक्यावर मारहाण केल्याचे तपासात समोर आले आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने घरातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलाला रुग्णालयात नेऊन अन्न घशात अडकल्याने तो बेशुद्ध पडल्याचे खोटे कारण सांगितल्याचा आरोप आहे.

आईलाही होती माहिती

या प्रकरणात २१ वर्षीय अखिला हिनेही पोलिसांसमोर जबाब दिला आहे. आपल्या मुलाला अनेक वेळा मारहाण होत असल्याचे आपण पाहिले होते, अशी कबुली तिने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, अर्शिदच्या जन्माच्या काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर अखिला अश्कारसोबत राहू लागली. अश्कार हा व्यवसायाने चालक असल्याचे सांगितले जाते.

पहिल्या पत्नीवरील अत्याचारांचाही तपास

दरम्यान, अश्कारविरोधात आणखी गंभीर आरोप समोर आले आहेत. त्याने आपल्या पहिल्या पत्नी अमीना हिच्यावरही क्रूर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमुळे ती गंभीर अवस्थेत असून कोमामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस या आरोपांचीही चौकशी करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in