बंगळुरू : फास्ट-फूडच्या नावाखाली घाणेरडे स्वयंपाकघर, कुजलेले मांस; KFC आउटलेटवर ग्राहकांचा गंभीर आरोप

जगप्रसिद्ध फास्ट-फूड ब्रँड KFC पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण चव नव्हे तर अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा गंभीर मुद्दा आहे. कर्नाटकातील बंगळुरूच्या HSR लेआउट येथील KFC आउटलेटमधील एका महिलेचा धक्कादायक अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Photo - FPJ
Photo - FPJ
Published on

जगप्रसिद्ध फास्ट-फूड ब्रँड KFC पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण चव नव्हे तर अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा गंभीर मुद्दा आहे. कर्नाटकातील बंगळुरूच्या HSR लेआउट येथील KFC आउटलेटमधील एका महिलेचा धक्कादायक अनुभव सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Karnataka Portfolio या X अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, संबंधित महिलेला ऑर्डर केलेल्या हॉट अँड स्पायसी झिंगर बर्गरमध्ये कुजलेले मांस आणि असह्य दुर्गंधी आढळली.

पोस्टनुसार, महिलेने कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता, त्यांनी 'हा फक्त सॉसचा वास आहे' असे म्हणत प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला. त्या बर्गर ऐवजी दुसरा बर्गर तिला देण्यात आला मात्र त्यातही कुजलेले मांस आढळले. यावरून महिला संतप्त झाली. त्याचवेळी उपस्थित इतर काही ग्राहकांनीही त्यांच्या बर्गरमध्ये घाणेरडा वास आणि घाणेरडे अन्न असल्याची तक्रार केली. एका ग्राहकाने नवा बर्गर मागितला, पण त्यालाही पुन्हा एकदा खराब पॅटी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला.

स्वयंपाकघर दाखवण्यास कर्मचाऱ्यांचा नकार

ग्राहकांनी जेव्हा स्वयंपाकघर दाखवण्याची मागणी केली, तेव्हा कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापक नसल्याचे सांगून प्रवेश नाकारला. मात्र ग्राहकांच्या दबावानंतर स्वयंपाकघर उघडण्यात आले, आणि तिथे जे दृश्य दिसले ते अधिकच अस्वस्थ करणारे होते.

पोस्टनुसार, स्वयंपाकघर अत्यंत अस्वच्छ होते. ब्रेडिंगसाठी वापरलेले पाणी दूषित आणि काळसर होते. फ्रीजमध्ये बुरशी, दुर्गंधीयुक्त मांस आणि गंजलेल्या ट्रे आढळल्या. जमिनीवर थुंकी आणि तेलाचे डाग दिसून आले. या सर्व गोष्टींचे व्हिडिओ त्या पेजने शेअर केले असून, ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.

पोलिस हजर झाल्यानंतरही स्वयंपाकघर बंद; तरी ऑर्डर सुरूच

पोस्टनुसार, पोलिसांना बोलावण्यात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सुमारे अर्धा तास स्वयंपाकघराला कुलूप लावून ठेवले, पण या काळातही स्विगी आणि झोमॅटोवरील ऑर्डर पूर्ण करत राहिले. अंदाजे ३०-४० ऑर्डर त्या वेळी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे, ज्यात तेच खराब घटक वापरले गेले असावेत, असा आरोप करण्यात आला आहे.

व्यवस्थापकाची कबुली

संबंधित ग्राहकांनी चौकशी केली असता, दुकानाच्या व्यवस्थापकाने कबूल केले की, “मी हे अन्न माझ्या कुटुंबाला देणार नाही, पण हे आमच्या मानकांनुसार आहे.” या वक्तव्यामुळे ग्राहकांचा संताप आणखी वाढला. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासन (FDA) यांच्याकडून चौकशी होण्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.

पूर्वीही घडला होता प्रकार

ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही जुलै महिन्यात एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने बेंगळुरूमधील केएफसीमध्ये अर्धवट शिजवलेले चिकन बर्गर दिल्याचा व्हिडिओ शेअर केला होता.

ग्राहकांनी काय करावे?

अन्न सुरक्षा तज्ञांच्या मते, अशा प्रकरणांत ग्राहकांनी अन्नाचा फोटो/व्हिडिओ पुरावा जतन करावा. FSSAI (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया) कडे ऑनलाइन तक्रार करावी. ब्रँडला अधिकृत मेलद्वारे रिपोर्ट पाठवावा, ज्यामुळे कारवाई शक्य होते.

ह्या घटनेने केएफसीसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in