
कोलकाता : कोलकात्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे अनेक भागात पाणी साचले असून, पाण्यात विजेचा प्रवाह उतरून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा तासांमध्ये शहरात ३५० मिमीहून अधिक पाऊस पडला असून, त्यामुळे शहरातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचले आहे.
रात्रभर पडलेल्या पावसामुळे महानायक उत्तम कुमार आणि रवींद्र सरोवर स्थानकांदरम्यान पाणी साचले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी शहीद खुदीराम बोस आणि मैदान स्थानकांदरम्यान मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली आहे. तसेच दक्षिणेश्वर आणि मैदान स्टेशनदरम्यान मर्यादित प्रमाणात मेट्रो चालवण्यात येत आहेत. पंपाचा वापर करून पाणी बाहेर काढले जात आहे. तसेच मेट्रो रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आणखी पावसाचा इशारा
मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, अनेक ठिकाणी वाहनांची ये-जा थांबली आहे. मेट्रो आणि रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. तसेच अनेक घरे आणि निवासी क्षेत्रात पाणी घुसले आहे. उत्तर-पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा पाऊस पडला, अशी माहिती हवामान विभागाने दिली. तसेच २५ सप्टेंबरच्या दरम्यान, पूर्व-मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागरादरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात आणखी पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.