Kosi Express Viral Video : ट्रेनला आग लागल्याची अफवा अन् प्रवाशांची घाबरगुंडी! महिला-मुलांसह ट्रेनमधून मारल्या उड्या

पाटणाजवळ कोसी एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरताच प्रवाशांची एकच पळापळ झाली. महिला आणि मुलांसह अनेकांनी आपत्कालीन दरवाजातून उड्या मारल्या. घटनेचा व्हिडीओ व्हायरल.
Kosi Express Viral Video : ट्रेनला आग लागल्याची अफवा अन् प्रवाशांची घाबरगुंडी! महिला-मुलांसह ट्रेनमधून मारल्या उड्या
Kosi Express Viral Video : ट्रेनला आग लागल्याची अफवा अन् प्रवाशांची घाबरगुंडी! महिला-मुलांसह ट्रेनमधून मारल्या उड्या
Published on: 

पाटणा : रेल्वेला आग लागल्याचं समजलं तर कोणाचीही घाबरगुंडी उडेल. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये घडला. पाटणाजवळ कोसी एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी महिला आणि लहान मुलांसह अनेक प्रवासी आपत्कालीन दरवाजातून खाली उतरू लागले, तर काहींनी घाईघाईत उड्याही मारल्या. जवळपास १० मिनिटं हा गोंधळ सुरू होता. मात्र, रेल्वेच्या तपासणीत गाडीला आग लागलीच नसल्याचं स्पष्ट झालं. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आग लागल्याच्या अफवेने उडाली प्रवाशांची तारांबळ

शनिवारी (दि. २८) संध्याकाळी सुमारे ४.३० वाजता बिहारमधील पाटणाजवळ राणीपूर रेल्वे फाटकाच्या परिसरात ही घटना घडली. कोसी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १८६२६) येथे असताना अचानक गाडीला आग लागल्याची अफवा पसरली. ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचताच डब्यांमध्ये घबराट पसरली. नेमकं काय घडलं आहे, याची खात्री नसतानाही अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी आपत्कालीन दरवाजांकडे धाव घेतली. त्यावेळी गाडी थांबलेली होती. काही प्रवासी खाली उतरले, तर काहींनी घाईघाईत उड्या मारल्या. महिला आणि लहान मुलांचाही यात समावेश होता. सुमारे १० मिनिटं प्रवाशांची पळापळ सुरू होती. अचानक झालेल्या या प्रकारामुळे रेल्वे रुळांच्या परिसरातही गोंधळ निर्माण झाला.

रेल्वे सुरक्षा दलाची घटनास्थळी धाव

राणीपूर रेल्वे फाटकावर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने पाटणा साहिब रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरना याबाबत कळवलं. माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) उपनिरीक्षक अवनीश कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि गाडीला आग लागली आहे का, याची माहिती घेतली.

पाहा व्हिडिओ

तपासणीत समोर आलं वेगळंच सत्य

रेल्वे सुरक्षा दलाच्या तपासणीत कोसी एक्स्प्रेसला आग लागल्याची माहिती पूर्णपणे अफवा असल्याचं स्पष्ट झालं. गाडीत आग लागण्याची कोणतीही घटना घडली नव्हती, असं उपनिरीक्षक अवनीश कुमार यांनी सांगितलं. परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर सुमारे १० मिनिटांनी सर्व प्रवासी पुन्हा सुरक्षितपणे गाडीत बसले. त्यानंतर कोसी एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. गाडी पाटणा साहिब स्थानकात पोहोचल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तिची पुन्हा तपासणी केली. त्यावेळीही आग लागल्याचा कोणताही प्रकार आढळला नाही.

Kosi Express Viral Video : ट्रेनला आग लागल्याची अफवा अन् प्रवाशांची घाबरगुंडी! महिला-मुलांसह ट्रेनमधून मारल्या उड्या
वडा खायला घेतला अन् दाताखाली आला लोखंडी बोल्ट; 'वंदे भारत'मधील प्रवाशाचा VIDEO व्हायरल, IRCTC ने दिली प्रतिक्रिया

सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप

या गोंधळात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, केवळ एका अफवेमुळे प्रवाशांमध्ये किती मोठी घबराट निर्माण होऊ शकते, हे या घटनेतून दिसून आलं. कोणत्याही माहितीची खात्री न करता घाईघाईने रेल्वेतून उड्या मारणं जीवघेणं ठरू शकतं. सुदैवाने या वेळी मोठा अनर्थ टळला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)