
लडाखला सहाव्या अनुसूचीत समाविष्ट करावे आणि पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा या मागण्यांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बुधवारी (दि. २४) हिंसक वळण लागले. आंदोलकांनी दगडफेक, जाळपोळ आणि पोलिसांशी झटापट केली. या संघर्षात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ३० सुरक्षा जवानांसह एकूण ७० जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कर्फ्यू लागू करून इंटरनेट सेवा बंद केली आहे. या सर्व प्रकारामागे कॉँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आंदोलक आक्रमक - भाजप कार्यालय जाळलं
लेहमध्ये झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. आंदोलकांनी भाजपचं कार्यालय पेटवलं, सीआरपीएफचं वाहन जाळलं. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता दगडफेक झाली. यात मोठ्या प्रमाणावर लोक जखमी झाले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी त्यांचे उपोषण संपवल्याची घोषणा केली. उपोषणाचा हा १५ वा दिवस होता.
भाजपचा काँग्रेसवर गंभीर आरोप
हिंसाचारानंतर राजकीय वादाला उधाण आलं आहे. भाजपने थेट काँग्रेसवर आरोप करत, हा हिंसाचार काँग्रेसचा धोकादायक कट आहे असा दावा केला. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, काँग्रेसकडून देश तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. राहुल गांधी आणि जॉर्ज सोरोस यांच्या कटामुळे लडाख जळत आहे. बांगलादेश, नेपाळ आणि फिलीपिन्ससारखी परिस्थिती निर्माण करणे हा काँग्रेसचा डाव आहे. त्यांनी पुढे टोला लगावत सांगितले की, २०१४ पूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीनअस्मानाचा फरक आहे. देश आज जागतिक स्तरावर चमकतो आहे. अशा कटांना जनता कधीच बळी पडणार नाही.
काँग्रेस नगरसेवकावर आरोप, पण वांगचुकांचा पलटवार
भाजप नेते आणि आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी हिंसाचारामागे काँग्रेस नगरसेवक फुटसोग स्टॅनजिन यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र, सोनम वांगचुक यांनी यावर पलटवार करत सांगितले, या भागात काँग्रेसचा इतका प्रभाव नाही. ५ हजार तरुणांना रस्त्यावर उतरवण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
आंदोलक तरुण आणि विद्यार्थ्यांनी चार प्रमुख मागण्या केल्या आहेत :
लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा
सहाव्या अनुसूचीत समावेश करून घटनात्मक सुरक्षा द्यावी
कारगिल व लेहसाठी स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ तयार करावा
सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे
या मागण्यांसाठी गेल्या काही आठवड्यांपासून आंदोलन सुरू आहे.
प्रशासन सतर्क
लेह आणि कारगिल भागात कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेट सेवा स्थगित आहे. पोलिस व केंद्रीय सुरक्षा दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र, स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष असून आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.