पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा

बिहार विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राष्ट्रीय जनता दलात (RJD) अंतर्गत तणाव उफाळून आला आहे. पक्ष अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी कुटुंबाशी संबंध तोडण्याची आणि राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा धक्कादायक निर्णय; राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा
Published on

बिहार विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राष्ट्रीय जनता दलात (RJD) अंतर्गत तणाव उफाळून आला आहे. पक्ष अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी कुटुंबाशी संबंध तोडण्याची आणि राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी हा निर्णय घेऊन त्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

रोहिणी आचार्य यांची मोठी घोषणा

रोहिणी यांचे वडील लालू प्रसाद यांच्याशी राजकारणापलीकडे नाते आहे. लालू प्रसाद यादव आजही किडनीच्या आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना रोहिणी यांनी आपली एक किडनी दान केली आहे. कुटुंबाशी इतके घनिष्ट नाते असणाऱ्या रोहिणी यांचा हा निर्णय धक्कादायकच आहे.

त्यांनी X वर पोस्ट केले, की "मी राजकारण सोडत आहे आणि मी माझ्या कुटुंबाचा त्याग करत आहे. संजय यादव आणि रमीझ यांनी मला हेच करायला सांगितले होते...आणि मी सर्व दोष घेत आहे." रोहिणी यांनी आधी केवळ राजकारण आणि कुटुंब त्यागाची घोषणा केली होती; त्यानंतर त्यांनी पोस्ट एडिट करून संजय यादव आणि रमीझ यांचे नाव घेतले. या दोघांच्या दबावातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हंटले जात आहे.

RJD साठी मोठा धक्का

या निवडणुकीत लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यांच्या समीकरणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे स्पष्ट दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या समीकरणाने यादव बहुल क्षेत्रातही RJD ला मोठा पराभव पत्करावा लागला. २०२० मध्ये जिथे ५५ यादव आमदार निवडून आले होते. महाआघाडीने उभे केलेल्या ६६ यादव उमेदवारांपैकी फक्त १२ जणांचा विजय होणे हे RJD साठी मोठे अपयश मानले जात आहे.

एनडीएकडे यादवांचा कल

एनडीएने या निवडणुकीत २३ यादव उमेदवारांना तिकिटे दिली, त्यापैकी १५ जण विजयी ठरले. या निकालातून यादव समाजाचा मोठा भाग RJD ऐवजी एनडीएच्या बाजूला वळल्याचे पाहायला मिळाले. या पराभवामुळे RJD चा अंतर्गत राजकीय आणि कौटुंबिक कलह समोर आला आहे. RJDचा पराभव आणि रोहिणी यांचा राजकारण-कुटुंब त्यागाचा निर्णय कोणते वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in