बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का; IRCTC घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित, RJD समोर दुहेरी संकट

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दल (RJD) च्या नेतृत्वाला मोठा झटका बसला आहे. IRCTC घोटाळा प्रकरणात दिल्लीतील राउज अ‍ॅव्हेन्यू कोर्टाच्या विशेष CBI न्यायालयाने लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात मोठा निर्णय दिला आहे.
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का; IRCTC घोटाळा प्रकरणी आरोप निश्चित, RJD समोर दुहेरी संकट
Published on

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय जनता दल (RJD) च्या नेतृत्वाला मोठा झटका बसला आहे. IRCTC घोटाळा प्रकरणात दिल्लीतील राउज अ‍ॅव्हेन्यू कोर्टाच्या विशेष CBI न्यायालयाने लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात मोठा निर्णय दिला आहे. RJD प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांचा मुलगा माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत.

पदाचा दुरुपयोग करून मोठा घोटाळा - कोर्टाचा निर्णय

विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी सोमवारी (दि. १३) हा आदेश दिला. विशेष CBI कोर्टाने आपल्या निरीक्षणात नमूद केले की, रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी IRCTC हॉटेल टेंडर प्रक्रियेत थेट हस्तक्षेप केला होता. त्यांनी सरकारी अधिकारांचा दुरुपयोग करत रांची आणि पुरी येथील दोन IRCTC हॉटेल्स हे सुजाता हॉटेल्स नावाच्या कंपनीला बनावट निविदा प्रक्रियेद्वारे भाडेतत्त्वावर दिले. त्या बदल्यात कोट्यवधी रुपयांची जमीन यादव यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीला बाजारभावाच्या अगदी कमी किंमतीत हस्तांतरित करण्यात आली.

मी निर्दोष - लालू प्रसाद यादव

या प्रकरणात CBI ने २०१८ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. आता न्यायालयाने आरोप निश्चित करून खटल्याची औपचारिक सुरुवात केली आहे. कोर्टाने या तिघांविरुद्ध फसवणूक, भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग या विविध कलमांखाली आरोप निश्चित केले. या आरोपांनंतर लालू प्रसाद यादव यांनी 'मी निर्दोष आहे' असे सांगत सर्व आरोप नाकारले. त्यामुळे आता हा खटला पुढे चालू राहणार आहे.

RJD समोर दुहेरी संकट

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना न्यायालयाचा निकाल आल्याने बिहार निवडणुकीला वेगळे वळण लागले आहे. या खटल्याचा निकाल निवडणुकीपूर्वी लागण्याची शक्यता कमी आहे.

तर, दुसरीकडे RJD आणि काँग्रेसमध्ये आघाडीतील जागावाटपावरून मतभेद वाढले आहेत. RJD ने काँग्रेसला ५२ जागा देण्याचा प्रस्ताव दिला असला, तरी काँग्रेस ६० जागांवर ठाम आहे. त्यामुळे चर्चा थांबली असून, आज दिल्लीतील काँग्रेस केंद्रीय निवड समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत RJD समोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in