वायनाडमध्ये भूस्खलन! १२३ जणांचा मृत्यू, ४०० जण बेपत्ता; केरळात दोन दिवसांचा दुखवटा

Wayanad landslides : केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी ४ वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाले.
वायनाडमध्ये भूस्खलन! १२३ जणांचा मृत्यू, ४०० जण बेपत्ता; केरळात दोन दिवसांचा दुखवटा
Published on

वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी ४ वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन झाले. रात्री २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत झालेल्या या भीषण नैसर्गिक आपत्तीत मुंडक्कई, चुरलमाला, अट्टामाला व नुलपूझा ही ४ गावे वाहून गेली आहेत. या दुर्घटनेत १२३ जणांचा मृत्यू झाला असून ४०० जण बेपत्ता आहेत. ११६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफने बचावकार्य हाती घेतले आहे. केरळ सरकारने या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

कुन्नूरहून लष्कराचे २२५ जवान घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. तसेच हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स बचावकार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे ती पुन्हा कोझीकोओला परत गेली. लष्कराचे विशेष श्वान पथक भूस्खलन झालेल्या भागात पाठवले आहे.

मुंडक्कई गावाचे सर्वाधिक नुकसान

वायनाडच्या मुंडक्कई गावाचे या भूस्खलनात मोठे नुकसान झाले. चुरलमालाला मुंडक्कईशी जोडणारा पूल वाहून गेल्याने येथे बचावकार्य करणे कठीण बनले आहे. एनडीआरएफचे पथक चालत या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. मुंडक्कईत २५० लोक अडकल्याची शक्यता आहे. येथील अनेक घरे वाहून गेली असून तेथे ६५ कुटुंबे राहतात. जिल्हा पंचायत अध्यक्ष समशाद मरईक्कर म्हणाले की, मुंडक्कई येथे रस्त्याने परतणे शक्य नाही. मोबाईल नेटवर्क ठप्प झाले आहे. चुरलमाला गावाचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरे वाहून गेली आहेत. दोन परदेशी नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. वायनाडच्या चुरलमाला येथे जखमींवर उपचार करायला मशीद, मदरशामध्ये तात्पुरते रुग्णालय बनवले आहे.

पंतप्रधानांकडून शोक, दोन लाख रुपयांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायनाड भूस्खलन प्रकरणात मरण पावलेल्या नागरिकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्या नातेवाईकांना दोन लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे.

राहुल गांधी आज वायनाड दौऱ्यावर

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले असून, गांधी हे बुधवारी वायनाड दौऱ्यावर जाणार आहेत.

वायनाडमध्ये भूस्खलनाची कारणे

वायनाड हा केरळचा एकमेव पठारी भाग आहे. २०२१ च्या भारतीय भूगर्भ संस्थेच्या अहवालानुसार, केरळचा ४३ टक्के भाग हा भूस्खलनात मोडतो, तर वायनाडची ५१ टक्के जमीन ही उताराची आहे. त्यामुळे तेथे कायमच भूस्खलनाची समस्या जास्त आहे. वायनाडचे पठार पश्चिम घाटात ७०० ते २१०० मीटर उंचीवर आहे. मान्सून पश्चिम घाटावर धडकतो. त्यामुळे वायनाडमध्ये जोरदार पाऊस होतो. या भागात भूस्खलनामुळे नद्यांना पूर आल्याने मोठे नुकसान झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in