
लखनौ : पाकिस्तानच्या आयएसआयशी लागेबांधे असलेला बब्बर खालसाच्या सक्रिय दहशतवाद्याला गुरुवारी सकाळी कौशंबी जिल्ह्यातून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. महाकुंभदरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची योजना त्याने आखली होती.
या दहशतवाद्याचे नाव लाजर मसीह असे असून उत्तर प्रदेश विशेष कृती दल (एसटीएफ) आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. प्रयागराजमध्ये महाकुंभदरम्यान मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना त्याने आखली होती, असे उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांतकुमार यांनी महाकुंभवर हल्ल्याचा कट येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
तथापि, धार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असल्याने आणि कसून तपासणी केली जात असल्याने मसीह दहशतवादी हल्ला करू शकला नाही. मसीहच्या अटकेमुळे पाकिस्तानातून शस्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मसीह हा अमृतसरमधील रामदास परिसरातील कुर्लियन गावचा रहिवासी आहे.
जर्मनीस्थित बब्बर खालसा इंटरनॅशनलचा म्होरक्या स्वर्णसिंग उर्फ जीवन फौजी याच्यासाठी मसीह काम करीत होता आणि त्याचे पाकिस्तानच्या आयएसआयशी लागेबांधे होते, असे पोलिसांनी सांगितले.
मसीहकडून स्फोटक साहित्य आणि बेकायदेसीर शस्त्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. हँड ग्रेनेड, डिटोनेटर्स, परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि परदेशी बनावटीची १३ काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गझियाबाद येथील पत्ता असलेले आधार कार्ड, सीम कार्ड नसलेला भ्रमणध्वनीही जप्त करण्यात आला आहे. मसीह हा २४ सप्टेंबर २०२४ रोजी पंजाबमध्ये न्यायालयीन कोठडीतून पसार झाला होता.