
थलासरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नऊ स्वयंसेवकांना केरळच्या थलासरी न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ३ ऑक्टोबर २००५ मध्ये सीपीआयचा (एम) कार्यकर्ता रिजिथ शंकरन याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने १९ वर्षांनंतर निकाल देताना नऊ स्वयंसेवकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
रिजिथ शंकरन हा डाव्या विचारांचा कार्यकर्ता होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) यांच्यात वादावादी सुरू होती. ३ ऑक्टोबर २००५ या दिवशी रिजिथ हा त्याच्या घरी जात होता. त्याच्याबरोबर त्याचे मित्रही होते. त्यावेळी संघ स्वयंसेवकांचा एक जमाव त्या ठिकाणी आला. त्यांच्याकडे शस्त्रे होती. त्यांनी रिजिथ आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली. रिजिथला या मारहाणीत गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या, तर त्याचे इतर मित्र किरकोळ जखमी झाले. या प्रकरणात आता थलासरी न्यायालयाने नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेल्यांमध्ये सुधाकरन (५७), जयेश (४१), रणजीत (४४), अजिंदरन (५१), अनिलकुमार (५२), राजेश (४६), श्रीजीत (४३) आणि भास्करन (६७) यांचा समावेश आहे.