

देशभरात वाढत असलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडेन, HP गॅस आणि भारत गॅस कंपन्यांनी घरगुती LPG ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) किंवा OTP शेअर करण्याच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
गॅस कंपन्यांच्या माहितीनुसार, सायबर भामटे अधिकृत एजन्सी अधिकारी असल्याचं भासवत ग्राहकांना बनावट SMS आणि WhatsApp संदेश पाठवतात. त्यानंतर फोन करून “व्हेरिफिकेशन”च्या नावाखाली DAC किंवा OTP मागतात. ग्राहकांनी हा कोड शेअर करताच संबंधित ग्राहकाचं प्रोफाइल किंवा बँकिंग अॅप्सची माहिती हॅक करून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे.
फसवणूक नेमकी कशी केली जाते?
सायबर गुन्हेगारांकडून ग्राहकांना सिलिंडर डिलिव्हरी रद्द होणार असल्याचं सांगितलं जातं. "तत्काळ OTP सांगा, नाहीतर डिलिव्हरी होणार नाही," असं सांगून ग्राहकांची फसवणूक केली जाते. काही प्रकरणांमध्ये बनावट लिंक पाठवून ग्राहकांना त्यावर क्लिक करण्यास भाग पाडलं जात असल्याचंही समोर आलं आहे.
गॅस कंपन्यांकडून ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना
HP आणि भारत गॅसचा ४ अंकी DAC तसेच इंडेनचा ६ अंकी DAC फक्त सिलिंडर प्रत्यक्ष घरी आल्यावरच डिलिव्हरी कर्मचाऱ्याला द्यावा.
फोन, WhatsApp किंवा इतर कोणत्याही माध्यमातून OTP किंवा DAC शेअर करू नये.
अधिकृत संदेश सहसा “VM-HPGAS”, “VK-INDANE” किंवा “AD-BPCL” अशा व्हेरिफाइड आयडीवरूनच येतात.
वैयक्तिक मोबाईल नंबरवरून आलेले संदेश संशयास्पद समजावेत.
LPG सिलिंडरचे सध्याचे दर
११ मे २०२६ रोजी देशातील काही प्रमुख शहरांतील १४.२ किलो घरगुती LPG सिलिंडरचे दर पुढीलप्रमाणे आहेत :
नवी दिल्ली - ९०३ रुपये
मुंबई - ९०२.५० रुपये
कोलकाता - ९२९ रुपये
चेन्नई - ९१८.५० रुपये
पटना - १,००२.५० रुपये
बेंगळुरू - ९१५.५० रुपये
हैदराबाद - ९६५ रुपये
अधिकृत अॅप्सचाच वापर करण्याचं आवाहन
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना पुढील काळात इंधन दरांवर दबाव वाढू शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. ग्राहकांनी सिलिंडर बुकिंगसाठी IndianOil One, Hello BPCL किंवा HP Pay यांसारख्या अधिकृत अॅप्सचाच वापर करावा, असं आवाहन कंपन्यांनी केलं आहे.