छत्तीसगड : सुरक्षा दलांवर मोठे हल्ले घडवणारा कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा ठार; सरकारने ५ कोटींचे ठेवले होते बक्षीस

छत्तीसगड आणि शेजारील राज्यांच्या सीमावर्ती भागात आज (दि. १८) पहाटे सुरक्षा दलांनी राबवलेल्या मोहिमेत देशातील कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा याचा खात्मा करण्यात आला.
छत्तीसगड : सुरक्षा दलांवर मोठे हल्ले घडवणारा कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा ठार; सरकारने ५ कोटींचे ठेवले होते बक्षीस
Published on

छत्तीसगड आणि शेजारील राज्यांच्या सीमावर्ती भागात आज (दि. १८) पहाटे सुरक्षा दलांनी राबवलेल्या मोहिमेत देशातील कुख्यात नक्षली कमांडर माडवी हिडमा याचा खात्मा करण्यात आला. हिडमा याच्यासह त्याची पत्नी राजे उर्फ राजक्का आणि आणखी ४ नक्षलवादीही ठार करण्यात आले. हिडमा अनेक वर्षे सुरक्षा दलांच्या यादीतील सर्वात 'मोस्ट वॉन्टेड' नक्षलवादी होता. त्याने सुरक्षा दलांवर किमान २६ मोठे हल्ले केले होते. टॉप कमांडर बसवा राजू ठार झाल्यानंतर माओवादी संघटनेचे नेतृत्व हिडमाकडे आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश-छत्तीसगड-तेलंगणा या त्रि-सीमा प्रदेशातील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील दाट जंगलात नक्षलवाद्यांचा मोठा तळ असल्याची खात्रीलायक माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर डीआरजी आणि इतर संयुक्त पथकांनी पहाटेच परिसराला वेढा घालत कारवाई सुरू केली.

जवानांनी नक्षलवाद्यांच्या तळाजवळ पोहोचताच दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबाराला सुरुवात झाली. चकमक जवळपास काही तास सुरू राहिली आणि अखेरीस हिडमा व त्याच्या सहकाऱ्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले. घटनास्थळावर मिळालेल्या सहा मृतदेहांव्यतिरिक्त अजून काही नक्षलवादी जंगलात पळून गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

हिडमा : नक्षलवाद्यांचा सर्वात भीतीदायक चेहरा

माडवी हिडमा (वय ४४) हा नक्षलवाद्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी’च्या बटालियन-१चा प्रमुख आणि नंतर माओवादी संघटनेचा सर्वात तरुण सरचिटणीस बनला होता. १९८१ मध्ये छत्तीसगडमधील सुकमा येथे जन्मलेल्या हिडमाने अल्पवयातच नक्षल चळवळीत प्रवेश केला. जंगलातील नेटवर्क व अतिशय गुप्त हालचाली यामुळे तो झपाट्याने नेतृत्व स्थानी पोहोचला. त्याच्यावर छत्तीसगड, आंध्र आणि तेलंगणा सरकारकडून मिळून ५ कोटी रुपयांहून अधिक बक्षीस जाहीर होते.

देश हादरवणारे हल्ले

हिडमाने गेल्या दशकभरात अनेक मोठ्या आणि भीषण हल्ल्यांचे नेतृत्व केले होते. त्यातील प्रमुख हल्ले म्हणजे

  • २०१० - दंतेवाडा - CRPFच्या ७६ जवानांची निघृण हत्या

  • २०१३ - झिरम घाटी - काँग्रेस नेत्यांवर हल्ला; २७ जण ठार

  • २०२१ - सुकमा-बिजापूर - तीव्र चकमक; २२ जवान शहीद

याशिवाय बस्तर परिसरात २६ हून अधिक मोठ्या आक्रमणांचे नेतृत्व

या सततच्या हल्ल्यांमुळे हिडमा देशातील अंतर्गत सुरक्षेसाठी सर्वात मोठे आव्हान मानला जात होता. गेल्या काही वर्षांत सुरक्षा दलांनी सातत्याने राबवलेल्या ऑपरेशन्समुळे नक्षलवाद्यांची क्षमता आधीच मोठ्या प्रमाणात घटली आहे. चकमकीनंतर सर्व मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शस्त्रे, साहित्य, स्फोटके आणि नकाशे यांचाही मोठा साठा जवानांच्या हाती लागल्याचे समजते. फोर्सने संपूर्ण परिसर सील केला असून जवळच्या गावांनाही सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in