
लखनऊ : प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान महाकुंभ मेळा होणार आहे. या महाकुंभची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. महाकुंभला येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे खुद्द महाकुंभच्या तयारीचा आढावा घेत आहेत. या पवित्र धार्मिक सोहळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या तिजोरीत जवळपास २ लाख कोटी रुपये जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, या महाकुंभला ४० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला दोन लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकणार आहे. महाकुंभ ही भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. यामुळे देश-विदेशातील जनतेला आपल्या प्राचीन परंपरा समजण्यास मदत मिळणार आहे. येणाऱ्या पिढ्यांनाही हे महाकुंभ मार्गदर्शक ठरेल. संतांच्या सान्निध्यात होणारा हा महाकुंभ यशस्वी करण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करत आहेत.
भव्यदिव्य आणि डिजिटल महाकुंभ
यंदाचा महाकुंभ भव्यदिव्य आणि डिजिटल असेल. भाविकांच्या सुविधांसाठी पर्यटन नकाशा, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने सुरक्षा यंत्रणा व स्मार्टफोनच्या सहाय्याने प्रसाधनगृहाची स्वच्छता पाहण्याची सोय करण्यात आली आहे.
भाविकांमुळे रोजगार वाढला
ते म्हणाले की, भाविक जेव्हा उत्तर प्रदेशात येतात. तेव्हा प्रवास, निवास व भोजन आदींमुळे स्थानिक व्यवसाय व रोजगार वाढतो. २०२४ मध्ये १६ कोटी भाविकांनी काशी विश्वनाथांचे दर्शन केले, तर अयोध्येत जानेवारी ते सप्टेंबर २०२४ मध्ये १३ कोटी ५५ लाख भाविक आले.
चार प्रकारच्या तंबूंची व्यवस्था
डिलक्स, प्रीमियम, डिलक्स ऑन रॉयल बथ आणि प्रीमियम ऑन रॉयल बाथ अशा चार प्रकारच्या तंबूची व्यवस्था आहे.
डिलक्स रूममध्ये एक दिवसाचे भाडे १०,५०० रुपये आहे. यात न्याहारीची व्यवस्था आहे. प्रीमियम श्रेणीचे दिवसाचे भाडे १५,५२५ रुपये आहे. शाहीस्नानाच्या दिवशी डिलक्स तंबूचे भाडे १६,१०० रुपये आहे, तर शाहीस्नानाच्या दिवशी प्रीमियम श्रेणीतील तंबूचे प्रति दिवस भाडे २१,७३५ रुपये आहे.
तसेच त्रिवेणी संगमाजवळ सरकारने विविध तंबूंची सुविधा दिली आहे. त्याचे दर १,५०० रुपये ते ३५ हजार रुपये प्रति दिवस आहेत.
अदानी देणार १ लाख लोकांना महाप्रसाद
या महाकुंभमध्ये उद्योगपती गौतम अदानी रोज एक लाख भाविकांना प्रसादाचे वाटप करणार आहेत. यासाठी त्यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस (इस्कॉन) सोबत हातमिळवणी केली आहे.
एका तंबूचे भाडे दिवसाला १ लाख रुपये
महाकुंभमध्ये राहण्याची शाही व्यवस्था आहे. ‘टीयूटीसी’मध्ये राहण्याची सोय नदीच्या किनारी केली आहे. यात ४४ तंबू आहेत. त्यात दोन जणांची राहण्याची व्यवस्था आहे. या तंबूचे एका दिवसाचे भाडे १ लाख रुपये आहे. या तंबूत बटलरपासून रूम हिटर, बाथरूम, गिझर आदी सुविधा आहेत. १४, २९ जानेवारी व ३ फेब्रुवारीला या तंबूंना मोठी मागणी आहे. कारण या दिवशी शाहीस्नान होणार आहे.