
महाकुंभनगर : महाकुंभ मेळ्याला येणाऱ्या गरीब व सर्वसामान्य माणसाला अवघ्या ९ रुपयांत जेवण मिळणार आहे. यासाठी ‘माँ की रसोई’ हे कम्युनिटी किचन उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी केले.
‘नंदी सेवा’ संस्थेतर्फे हे कम्युनिटी किचन चालवले जाणार आहे. गरीबांना स्वस्तात या अन्नाचा लाभ घेता येणार आहे.
प्रयागराज येथे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी ‘माँ की रसोई’चे उद्घाटन करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. तेथे काही भाविकांना त्यांनी स्वत: भोजन वाढले. ९ रुपयांत भाविकांना डाळ, चार चपात्या, भाजी, भात, सलाड, गोड पदार्थ देण्यात येईल. ‘माँ की रसोई’ पूर्णपणे वातानुकूलित असून ती २ हजार चौरस फुटात वसली आहे. एकाचवेळी १५० जण तेथे भोजन घेऊ शकतात.
प्रचारभारतीतर्फे ‘कुंभवाणी’ एफएम वाहिनी
प्रचारभारतीतर्फे कुंभमेळ्यासाठी खास ‘कुंभवाणी’ एफएम वाहिनी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. १० जानेवारी ते २६ फेब्रुवारीदरम्यान ही वाहिनी सुरू राहील.
आयोजनावर प्रचंड खर्च
कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी ६,३८२ कोटी रुपये खर्च झाले असून, राम मंदिरासाठी १८०० कोटी, स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी तीन हजार कोटी, नवीन संसद भवन उभारण्यासाठी ९७१ कोटी रुपये लागले आहेत.
कुंभमध्ये मुस्लिमांचेही स्वागत
ज्यांचा सनातन धर्मावर विश्वास आहे, त्या मुस्लिमांनीही येथे यावे. त्यांचे स्वागत आहे. मात्र, जे चुकीच्या मानसिकतेने येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही योगी यांनी यावेळी दिला.
‘आयपीएल’पेक्षा जास्त कमाई
‘आयपीएल’पेक्षा जास्त कमाई कुंभमेळ्यातून होणार आहे. २०१९ मध्ये १ लाख २० हजार कोटींची कमाई झाली होती तर ‘आयपीएल’मधून २०१९ मध्ये १२ हजार कोटी मिळाले होते. २०२३ मध्ये तिरुपती मंदिराची कमाई ४ हजार कोटी रुपये होती.
कुंभमेळ्याची आणखी वैशिष्ट्ये
भोजनातही कुंभमेळा सर्वात पुढे आहे. २०१९ च्या कुंभमेळ्यात ५४ हजार क्विंटल तांदूळ, ७८ हजार क्विंटल पीठ लागले होते. त्याचबरोबर महाकुंभसाठी यंदा १.५ लाख प्रसाधनगृहे बांधली आहेत. तसेच महाकुंभचे क्षेत्रफळ ४ हजार हेक्टर आहे. या कुंभमेळ्याला ४० कोटी भाविक येणार आहेत. ही संख्या अमेरिका व रशियाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक आहे.