
महाकुंभनगर (उत्तर प्रदेश) : धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला ‘महाकुंभ’ मेळा येत्या १३ जानेवारीपासून ‘प्रयागराज’ येथे सुरू होत आहे. या ‘महाकुंभ’ला येणाऱ्या नागरिक व साधूसंतांच्या स्वागतासाठी प्रयागराज सज्ज झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून उत्तर प्रदेशचे प्रशासन महाकुंभच्या तयारीसाठी युद्धपातळीवर काम करत आहे. नदीची स्वच्छता, रस्ते रुंदीकरण, घाट समतोल करणे आदी कामे केली जात आहेत.
दरमहा १२ वर्षांनी महाकुंभ मेळा भरतो. यंदा ‘पौष पौर्णिमे’ला १३ जानेवारीपासून या मेळ्याची सुरुवात होणार आहे. ४५ दिवसांनी २६ फेब्रुवारीला या मेळ्याची सांगता होईल. या मेळ्याला ४० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. शाही स्नान या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य असते. या प्रचंड व्यवस्थेसाठी उत्तर प्रदेश सरकार झटत आहे.
भाविकांच्या सोयीसाठी बँक, एटीएम तैनात केले आहेत. त्यामुळे भाविकांना सहजपणे आर्थिक व्यवहार करता येतील. भोजनासाठी स्वतंत्र कक्ष व लहान मुलांसाठी खेळण्याची जागा तयार केली आहे. १०० बेड्सचे रुग्णालय, २५ प्रथोमपचार कक्ष, १२५ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
भाविकांच्या मोजणीसाठी एआय कॅमेरे
या मेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या मोजणीसाठी एआयप्रणित कॅमेरे, आरएफआयडी रिस्टबॅण्ड, मोबाईल ॲॅप तयार केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘महाकुंभ’चे व्यवस्थापन केले आहे, असे उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश खन्ना यांनी सांगितले.
या मेळ्यासाठी खास वेबसाइट व ॲॅप तयार केले. तसेच एआयवर आधारित ११ भाषांचा चॅटबॉट तयार केला आहे. भाविक व वाहनांना ‘क्यूआर’वर आधारित पासेस दिले जातील. ‘हरवले व सापडले’ केंद्रही असेल. लाइव्ह सॉफ्टवेअरद्वारे ५३० प्रकल्पांवर लक्ष ठेवले जाणार आहे. भाविकांसाठी १०१ स्मार्ट पार्किंग सुविधा तयार केल्या आहेत. त्यात ५ लाख वाहनांचे पार्किंग करता येऊ शकते. पार्किंगसाठी १,८६७ हेक्टर जागा राखीव ठेवली आहे.
एक लाख ६० हजार तंबू
या कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी १ लाख ६० हजार तंबू, दीड लाख प्रसाधनगृह, १५ हजार स्वच्छता कर्मचारी, १,२५० किमीची पाइपलाइन, ६७ हजार एलईडी लाइट, २ हजार सौरदिवे, ३ लाख झाडे परिसरात लावण्यात आली आहेत. ९० रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. १,२५० किमी पाइपलाइनचे नेटवर्क तयार आहे. त्यातून पाण्याची ५० हजार कनेक्शन दिले जाणार आहेत. ८४ विजेच्या खांबांवरून ६७ हजार एलईडी लाइट, २०० पाण्याच्या जोडण्या सज्ज करण्यात आल्या आहेत.