महाकुंभमधील पाणी स्नान करण्यासाठी अयोग्य; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाचा अहवाल, 'एनजीटी'ला दिली माहिती

नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत ५० कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. रोज कोट्यवधी भाविक या पाण्यात आंघोळ करायला येत आहेत. मात्र, या पाण्याची नुकतीच तपासणी केली असता प्रयागराजच्या महाकुंभमधील गंगा-यमुनेचे पाणी स्नान करण्याच्या योग्यतेचे राहिलेले नाही, असा खळबळजनक अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) राष्ट्रीय हरित लवादाला दिला आहे.
महाकुंभमधील पाणी स्नान करण्यासाठी अयोग्य;  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाला दिली माहिती
महाकुंभमधील पाणी स्नान करण्यासाठी अयोग्य; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाला दिली माहितीएक्स @myogiadityanath
Published on

नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत ५० कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे. रोज कोट्यवधी भाविक या पाण्यात आंघोळ करायला येत आहेत. मात्र, या पाण्याचा दर्जा कसा आहे, याची कोणालाच फिकीर नाही. या पाण्याची नुकतीच तपासणी केली असता प्रयागराजच्या महाकुंभमधील गंगा-यमुनेचे पाणी स्नान करण्याच्या योग्यतेचे राहिलेले नाही, असा खळबळजनक अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) राष्ट्रीय हरित लवादाला दिला आहे. या अहवालामुळे किती अशुद्ध पाण्यात आपण आंघोळ करतोय याची जाणीव भाविकांनी होऊ शकेल.

प्रयागराजला हिंदू धर्मीयांचा पवित्र कुंभमेळा भरला आहे. प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी सध्या कोट्यवधी भाविक रोज येत आहेत. या पाण्याच्या चाचण्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतल्या असून त्याचा अहवाल तयार केला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे की, महाकुंभमध्ये विविध ठिकाणी आम्ही नदीच्या पाण्याच्या चाचण्या केल्या. त्यात ‘फिकल कोलीफॉर्म’ जीवाणू मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. त्यामुळे नदीत प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. मलनिस्सारणाच्या घाणेरड्या पाण्यात ‘फिकल कोलीफॉर्म’ची मर्यादा २५०० युनिट प्रति १०० मिली असते. प्रयागराजमध्ये गंगा व यमुना नदीत मलनिस्सारणाचे पाणी रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद सुनावणी करत आहे. महाकुंभ मेळ्यानिमित्त मलनिस्सारण नियंत्रण योजनेबाबत राष्ट्रीय हरित लवादाने उत्तर प्रदेश सरकारला आदेश यापूर्वीच दिले आहेत.

गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेची माहिती भाविकांना द्यावी - लवाद

राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) उत्तर प्रदेश सरकारला आदेश दिले की, भाविकांना महाकुंभच्या पाण्याच्या गुणवत्तेची माहिती द्यावी. मात्र, सरकारकडून अशी माहिती दिली जात नाही.

‘एनजीटी’ने २०२४ डिसेंबरमध्ये आदेश दिले होते की, महाकुंभच्या काळात प्रयागराजमध्ये गंगेचे पाणी पुरेसे उपलब्ध राहिले पाहिजे. तसेच हे पाणी आंघोळीसाठी व पिण्यासाठी चांगले असले पाहिजे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने ३ फेब्रुवारीला राष्ट्रीय हरित लवादाला महाकुंभ मेळ्यातील नदीचे पाणी खराब झाल्याचे सूचित केले होते. नदीचे पाणी स्नानासाठी आवश्यक गुणवत्तेचे राहिलेले नाही.

कुंभ स्नान केलेले भाविक पडले आजारी

कुंभमध्ये स्नान करून परतणारे भाविक आजारी पडत आहेत. अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागत असल्याचेही वृत्त आहे. वैद्यकीय तज्ज्ञाने सांगितले की, कुंभहून परतणाऱ्या भाविकांना काही वैद्यकीय समस्या उद्भवत आहेत. ज्या ठिकाणी लाखो लोक आंघोळ करतात तेथे काही आजार होण्याची शक्यता असते. कुंभमध्ये आंघोळ केलेल्या लोकांमध्ये पोटाचे विकार असलेल्यांची संख्या वाढताना दिसत आहे. रुग्णांमध्ये अतिसार-उलटी आदी समस्या दिसत आहेत. काही लोक तापाने हैराण झाले आहेत. अनेकांना श्वास घेताना त्रास होत आहे. थंडीच्या काळात तुम्ही उघड्यावर आंघोळ करत असल्यास सर्दी व खोकला होणे स्वाभाविक आहे, असे एका तज्ज्ञाने सांगितले.

२०१९ च्या कुंभमध्येही पाण्याची गुणवत्ता खराब होती

यापूर्वी २०१९ मध्ये प्रयागराज येथील कुंभमध्येही पाण्याची गुणवत्ता खराब होती, असा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता. २०१९ मध्ये १३ कोटी भाविक आले होते. करसर घाटावरील पाण्यात ‘बीओडी’ व ‘फिकल कोलीफॉर्म’ जीवाणूची मर्यादा जास्त होती.

logo
marathi.freepressjournal.in