
तृणमूल काँग्रेसच्या 'फायरब्रँड' नेत्या आणि खासदार महुआ मोइत्रा दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्याचं वृत्त आहे. बिजू जनता दलाचे माजी खासदार पिनाकी मिश्रा यांच्याशी त्यांनी गुपचुप लग्न केल्याचे समोर आले आहे. पिनाकी मिश्रा यांचेही हे दुसरे लग्न आहे. लग्नाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
महुआ मोइत्रा आणि पिनाकी मिश्रा यांनी जर्मनीत काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधल्याचं समजतंय. दोघे नेमके कोणत्या दिवशी विवाहबंधनात अडकले याची खात्रीलायक माहिती अद्याप समोर आली नसली तरी द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, ३० मे रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. तर, काही माध्यमांनी ३ मे रोजी हे लग्न झाल्याचं देखील नमूद केलं आहे. परंतु, महुआ मोइत्रा किंवा पिनाकी मिश्रा या दोघांपैकी कोणीही लग्नाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
महुआ मोइत्रा या ५० वर्षांच्या असून त्यांनी ६५ वर्षीय पिनाकी मिश्रा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. मिश्रा यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आणि मुलगी आहे. दुसरीकडे, महुआ मोइत्रा यांचे पहिले लग्न डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सन यांच्याशी झाले होते. त्यानंतर काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. लार्स ब्रॉर्सन हे स्वित्झर्लंडमधील Schindler Holding AG या कंपनीचे हेड ऑफ इन्व्हेस्टर रिलेशन्स म्हणून कार्यरत आहेत.
त्यानंतर जवळपास तीन वर्षे वकील जय अनंत देहदराय यांच्यासोबत महुआ मोइत्रा रिलेशनशिपमध्ये होत्या. आता पिनाकी मिश्रा यांच्यासोबतचे त्यांचे लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
महुआ मोईत्रा या मूळच्या आसामच्या आहेत. त्यांनी अमेरिकेतील माउंट होल्योक कॉलेजमधून पदवी घेतली. त्या सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम करत होत्या. त्यांनी २००९ साली तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१६ ते २०१९ च्या यशस्वी राजकीय कारकिर्दीनंतर त्या २०१९ साली खासदार झाल्या.
पिनाकी मिश्रा हे राजकारणी असण्यासोबतच सर्वोच्च न्यायालयात एक वरिष्ठ वकील आहेत. त्यांचे पहिले लग्न संगीता मिश्रा यांच्याशी झाले होते. संगीता मिश्रा या देखील वकील आहेत. त्यांनी १९९६ मध्ये पुरी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि पुरी येथून तत्कालीन खासदार आणि केंद्रीय मंत्री ब्रज किशोर त्रिपाठी यांच्याविरुद्ध विजय मिळवला. तीन वेळा ते खासदार राहिले आहेत. २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे संबित पात्रा यांनी पुरी येथून त्यांचा पराभव केला.