

दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लरिश इन स्टेझ हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी (दि.६) आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तपासादरम्यान हॉटेलमधील आचारीच्या कथित निष्काळजीपणामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान आग हॉटेलमधील आचारीच्या कथित निष्काळजीपणामुळे लागल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख केशव नेगी (वय ६५) अशी असून तो दिल्लीतील दिलशाद गार्डन परिसरातील रहिवासी आहे.
हॉटेल मालकाला चार दिवसांची पोलिस कोठडी
मालवीय नगर येथील बहुमजली फ्लरिश स्टे B&B मध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हॉटेलचा मालक लवकेश बजाज याला चार दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांनी राजधानीतील विविध भागांत छापे टाकून शोधमोहीम राबवल्यानंतर बजाजला अटक केली होती. त्यानंतर त्याला दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले.
एफआयआरची प्रत न मिळाल्याचा बचाव पक्षाचा दावा
सुनावणीदरम्यान बजाजच्या वकिलांनी बचाव पक्षाला प्रथम माहिती अहवालाची (FIR) प्रत देण्यात आलेली नसल्याचे न्यायालयाला सांगितले. यावर दिल्ली पोलिसांनी एफआयआरची प्रत उपलब्ध करून दिली जाईल, असे न्यायालयाला कळवले.
तपासासाठी पोलिस कोठडीची मागणी
चार दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करताना तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांबाबत अधिक माहिती मिळवणे आवश्यक आहे. आतापर्यंत केवळ दोन कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
तपासाचा भाग म्हणून हॉटेलची कागदपत्रे आणि कामकाजाशी संबंधित नोंदी तपासासाठी आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. बचाव पक्षाने मात्र बजाजला केवळ हॉटेलचा मालक असल्यामुळे अटक करण्यात आल्याचे म्हटले. अटकेमागील कारणे सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांवर असल्याचेही त्यांनी म्हटले.
दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आग इतकी भीषण होती की घटनास्थळी फॉरेन्सिक तपास अजून पूर्ण होऊ शकलेला नाही.
जखमींवर उपचार सुरू
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या १५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये १३ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
एकूण नऊ रुग्ण अतिदक्षता विभाग (ICU) आणि इतर वॉर्डमध्ये दाखल आहेत. दाखल केलेल्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन परदेशी रुग्णांना डिस्चार्ज
माहितीनुसार, ३ जून रोजी दुसऱ्या रुग्णालयातून आपत्कालीन विभागात आणण्यात आलेल्या दोन परदेशी जखमी रुग्णांना ४ जूनच्या सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. "दाखल सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळावेत यासाठी सर्वंकष वैद्यकीय सेवा आणि नियमित निरीक्षण सुरू आहे," अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.