
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहताना अनेकांना क्षणभर आश्चर्याचा धक्का बसतोय. कारण हा व्हिडीओ आहे एका अंत्ययात्रेचा...पण यामध्ये शोक नाही, रडारड नाही - उलट ढोल-ताशांच्या गजरात एक व्यक्ती मनसोक्त नाचताना दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकजण गोंधळले, काहींनी संतापही व्यक्त केला. पण, जेव्हा यामागचं कारण समोर आलं, तेव्हा नेटकऱ्यांचेही डोळे पाणावले.
कर्करोगाशी झुंजणाऱ्या मित्राची शेवटची इच्छा
ही हृदयस्पर्शी घटना मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील जावसिया गावात घडली. मृत व्यक्तीचे नाव सोहनलाल जैन, जे काही वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. जानेवारी २०२१ मध्ये, आजारी अवस्थेत असताना त्यांनी आपला जिवलग मित्र अंबालाल प्रजापती यांना एक पत्र लिहिलं. त्यात त्यांनी शेवटची एक अनोखी आणि भावनिक विनंती केली होती. त्यांनी लिहिलं, कि “माझ्या मृत्यूनंतर अंत्ययात्रेत मला हसत हसत निरोप द्या. रडू नका. माझ्या तिरडीपुढे नाचत, ढोल-ताशा वाजवत निरोप द्या. जर माझ्याकडून काही चुकलं असेल, तर मला माफ करा.”
पाहा व्हिडीओ
मित्राचं वचन निभावलं
सोहनलाल यांच्या मृत्यूनंतर अंबालाल यांनी हे पत्र हृदयात जपून ठेवले. अंत्ययात्रेच्या दिवशी, त्यांनी ढोल ताशाच्या तालावर नाचत शेवटचा निरोप दिला. चेहऱ्यावर हसू होतं, पण डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. हे दृश्य पाहून संपूर्ण गावही भावनिक झाले.
अंबालाल म्हणाले, "सोहन फक्त माझा मित्र नव्हता, तो माझं सर्वस्व होता. त्याने नाचायला सांगितलं आणि मी ते वचन पूर्ण केलं. त्याच्या आत्म्यास आता शांती मिळेल."
हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या मैत्रीचे कौतुक केले आहे.