

नवी दिल्ली : दिल्लीतील सनलाइट कॉलनीच्या आश्रम परिसरात रविवारी (दि. ६) रात्री गोंधळाला विरोध केल्याने मणिपुरी संगीतकार चोंगथम विक्रम सिंह (५५) यांच्यावर आठ जणांनी कथितरीत्या हल्ला केला. कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आलेल्या सिंह यांनी ढाब्याबाहेर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना विरोध केला होता. त्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग करत तिसऱ्या मजल्यावरील घराच्या जिन्याच्या लॉबीमध्ये त्यांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
गोंधळाला विरोध अन् थेट घरापर्यंत पाठलाग
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास सिंह कचरा टाकण्यासाठी घराबाहेर आले होते. त्यावेळी जवळच्या ढाब्यावरील काही कर्मचारी आणि फूड डिलिव्हरी बॉईज गोंधळ घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सिंह यांनी त्याला विरोध केल्यानंतर वाद वाढला. त्यानंतर आरोपींनी त्यांचा पाठलाग केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दरवाजा उघडला तेव्हा..
सिंह यांचा मुलगा यैफाबाने दिलेल्या माहितीनुसार, काही जण घराबाहेर दारू पिऊन मोठ्याने आरडाओरड करत होते. आवाजामुळे त्रास होत असल्याने त्यांचे वडील खाली गेले आणि त्यांना गोंधळ न करण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचे यैफाबाने सांगितले. "आम्ही दरवाजा उघडला तेव्हा वडील शर्टशिवाय होते आणि काही जण त्यांना मारहाण करत होते. आम्ही बाहेर आलो तेव्हा ते लगेच पळून गेले," असा दावा यैफाबाने केला.
यानंतर यैफाबाने वडिलांना तातडीने रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. त्यानंतर, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली.
जिन्याच्या लॉबीमध्ये मारहाण
या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, सिंह यांच्या इमारतीत आरोपी शिरले आणि जिन्याच्या लॉबीमध्ये त्यांच्यावर कथितरीत्या हल्ला केला. एका फुटेजमध्ये आरोपी इमारतीच्या जिन्यातून बाहेर पडताना दिसत आहेत. रात्री १२.०६ वाजता आरोपी तेथून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसते.
यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी, म्हणजे १२.१६ वाजता, सिंह यांचे कुटुंबीय त्यांना उपचारासाठी ओखला येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, सकाळी उपचारादरम्यान गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला.
मॉब लिंचिंगच्या कलमाखाली गुन्हा
या प्रकरणी सनलाइट कॉलनी पोलीस ठाण्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या समूहाकडून करण्यात येणाऱ्या मॉब लिंचिंगशी संबंधित भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून, आठवा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपींमध्ये ढाबा कर्मचारी, डिलिव्हरी एजंटचा समावेश
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी चौघे सैनी ढाब्यात काम करत होते. भारत कुमार (१९) आणि प्रमोद (२६) हे फूड डिलिव्हरी एजंट, तर दीपांशू (२१) आणि मोहन विश्वकर्मा (३२) हे फूड पॅकेजिंगचे काम करायचे.
इतर आरोपींमध्ये न्यू चौधरी ढाब्यातील फूड डिलिव्हरी एजंट रमजान खान (२२), अन्नपूर्णा ढाब्यातील फूड डिलिव्हरी एजंट विजय (३६) आणि डायमंड पिझ्झा किऑस्कमध्ये काम करणारा मन्नू (२६) यांचा समावेश आहे.
मणिपूरच्या रॉक संगीत क्षेत्रातील अग्रणी
चोंगथम विक्रम सिंह हे मणिपूरच्या रॉक संगीत क्षेत्रातील ओळखले जाणारे नाव होते. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी प्रसिद्ध फिनिक्स रॉक बँडमध्ये लीड गिटारिस्ट म्हणून काम केले. त्यापूर्वी अल्ट्रा वायर्स या बँडमधून त्यांनी संगीत क्षेत्रात प्रवेश केला होता. फिनिक्सनंतर ते ईस्टर्न डार्क या प्रसिद्ध स्थानिक बँडशीही जोडले गेले. त्यानंतर त्यांनी मणिपूर सोडून नवी दिल्ली गाठली आणि संगीत शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू ठेवली.
प्रसिद्ध गायिका चोंगथम कमला यांचे पुत्र
विक्रम सिंह यांना संगीताचा वारसा कुटुंबातूनच मिळाला होता. त्यांच्या आई चोंगथम कमला या मणिपूरमधील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका होत्या. एकेकाळी त्यांना 'मणिपुरी चित्रपटसृष्टीतील लता मंगेशकर' म्हणूनही ओळखले जात होते. त्यामुळे विक्रम सिंह यांच्या निधनाने मणिपूरच्या संगीतविश्वातही हळहळ व्यक्त होत आहे.