संघामुळेच मी मराठी भाषेशी जोडला गेलो! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महाराष्ट्राच्या भूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बी पेरले गेले होते, आज ते शताब्दी साजरी करत आहे.
पंतप्रधान मोदींना संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा यावेळी भेट म्हणून देण्यात आली. तसेच त्यांना साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पंतप्रधान मोदींना संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा यावेळी भेट म्हणून देण्यात आली. तसेच त्यांना साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.@narendramodi
Published on

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या भूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बी पेरले गेले होते, आज ते शताब्दी साजरी करत आहे. संस्कृती जपण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या शंभर वर्षांपासून करत आहे. आरएसएसने जगण्याची प्रेरणा दिली आहे आणि संघामुळेच मी मराठी भाषेशी जोडलो गेलो आहे. देशात तसेच पूर्ण जगात १२ कोटींपेक्षा जास्त मराठी लोक आहेत. त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम मला करता आले हे मी माझे सौभाग्य मानतो. भाषा केवळ संवादासाठी नाही, तर संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजात जन्म घेते, पण भाषा समाजाच्या निर्माणासाठी महत्त्वाची असते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे नवी दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात उद‌्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, समस्त मराठी भाषेच्या विद्वान ताराबाईंचे भाषण ऐकल्यावर मी म्हटले ‘फार छान’, त्यावर त्यांनी पण मला गुजराती भाषेत उत्तर दिले. ‘देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून आणि देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी साहित्यिकांना माझा नमस्कार’, असे मोदी मराठीमध्ये म्हणाले. आज दिल्लीच्या भूमीवर मराठी भाषेच्या या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एका भाषेपुरते मर्यादित नाही. संत तुकारामांच्या मराठीला दिल्ली अतिशय मनापासून नमन करते, असे मोदी यांनी नमूद केले.

‘देशातील तसेच जगातील सर्व मराठी प्रेमिकांना या कार्यक्रमाच्या मी शुभेच्छा देतो आणि आज तर ‘जागतिक मातृभाषा दिवस’ आहे आणि तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवससुद्धा अतिशय चांगला निवडला’, असे मोदी मराठीमध्ये म्हणाले. यावेळी मोदींनी संत ज्ञानेश्वरांच्या मराठी भाषेवरील ओळीदेखील म्हणून दाखवल्या. ‘मराठी भाषा अमृतापेक्षा जास्त गोड आहे. मराठी भाषेवर माझे जे प्रेम आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे. मी नेहमी मराठीमधील नवनवीन शब्दांना शिकण्याचा प्रयत्न करत असतो’, असे मोदी यांनी सांगितले.

मराठी एक संपूर्ण भाषा आहे. मराठीमध्ये शूरता आहे, वीरता आहे, सौंदर्य आहे, संवेदना आहे, समानता आहे समरसता पण आहे, अध्यात्माचे स्वर पण आहे आणि आधुनिकतेची लहर पण आहे, मराठी भाषेत शक्तीपण आहे, युक्तीपण आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, गोरा कुंभार, बहिणाबाई अशा अनेक संतांनी मराठी भाषेतून समाजाला नवी दिशा दिली आहे. सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने देखील मोठा बदल घडवला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवासारख्या वीर मराठ्यांनी शत्रूंना नामोहरम केले. स्वातंत्र्याच्या लढाईत वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांची झोप उडवली होती. ‘केसरी’सारखे वृत्तपत्र, राम गणेश गडकरी यांचे नाटक, यातून स्वातंत्र्याच्या लढ्याला चालना मिळाली, असे मोदी म्हणाले.

यापूर्वी पंतप्रधान पंडित नेहरूंनी केले होते संमेलनाचे उद्घाटन

यापूर्वी पंडित नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मात्र, यावेळी केवळ स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर उपस्थित होत्या. इतरांना सभागृहाबाहेर स्क्रीनवर हा सोहळा पाहावा लागला.

‘पसायदान’ हा महाराष्ट्राचा गाभा - संजय नहार

साहित्य ही कला आहे, संस्कृती आहे. ‘पसायदान’ हा महाराष्ट्राचा गाभा आहे. दिल्लीची मराठ्यांना एक अनामिक भीती आहे, तसेच आकर्षण पण आहे, हा इतिहास आहे. स्वातंत्र्यापूर्वी म्हटले जायचे की लेखणी सोडा आणि बंदुका हातात घ्या, मात्र आता वेळ आली आहे लेखणी हातात घ्या आणि बंदुका बाजूला ठेवा, असे ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मोदींच्या प्रोटोकॉलसाठी प्रथमच दोनदा उद्घाटन

मराठी साहित्य संमेलनाच्या १८७८ पासून सुरू असलेल्या परंपरेत यंदा प्रथमच संमेलनाचे दोन वेळा उद्घाटन करण्यात आले. आजपर्यंतच्या ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात यंदा दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचे दोन वेगवेगळ्या वेळी उद्घाटन झाले. पहिले उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असल्याने ते उद्घाटन फक्त निमंत्रितांसाठीच होते. पंतप्रधानांच्या उद्घाटन सोहळ्यानंतर उद्घाटनाचे दुसरे सत्र सुरू झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीत राज्य कारभार केला - फडणवीस

आपल्याला कल्पना आहे की, परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस आपल्या भाषेला प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले की राज्य कारभार मराठीमध्ये होणार आणि त्यांनी इतर भाषांमधील शब्दांना मराठीमध्ये रूपांतरित केले. त्यामुळे मराठी भाषा राज्य कारभाराची भाषा झाली. याचे श्रेय महाराजांना जाते. ताराबाईंचे भाषण ऐकल्यानंतर त्या भाषणातच आपण राहावे, असे वाटत आहे. मात्र, पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकण्याची उत्सुकतादेखील आपल्याला लागली आहे. मी आदरणीय पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानतो की मराठी भाषेला त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

मराठी माणूस देशाच्या कानाकोपऱ्यात दिसतो - शरद पवार

आपल्या महाराष्ट्राने अटकेपार झेंडा फडकावला आहे. मराठी माणूस केवळ महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीमध्ये दिसतो, हरयाणामध्ये दिसतो, गुजरातमध्ये दिसतो. देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस दिसून येतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानीत दुसऱ्यांदा होत आहे. संमेलनाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले याचा मला फार आनंद झाला. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्राचे रसिक, साहित्यिक या सर्वांनी पाठपुरावा केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदींनी मिळवून दिला. १९५४ साली पहिल्यांदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावेळी देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. त्यांनी संमेलनाचे उद्घाटन केले होते. मी जेव्हा या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी गेलो, तेव्हा मोदींनी एक मिनिटसुद्धा लावला नाही आणि महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आहे, तर माझी उपस्थिती असणारच, असे त्यांनी सांगून टाकले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला महिला अध्यक्ष लाभल्या याचाही मला आनंद आहे, असे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in