दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे शुक्रवारी (दि.५) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी संयुक्त निवेदने दिली. द्विपक्षीय संबंध, जागतिक घडामोडी, ऊर्जा भागीदारी ते युक्रेन संघर्ष यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली.
‘स्पेशल प्रिव्हिलेज्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा
यावेळी पीएम नरेंद्र मोदी म्हणाले, “मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे मनःपूर्वक स्वागत करण्याचा अभिमान बाळगतो. भारतावरील त्यांच्या मैत्रीबद्दल मी त्यांचे आभार मानतो.” पुढे ते म्हणाले, “२०१० मध्ये आपल्या भागीदारीला ‘स्पेशल प्रिव्हिलेज्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा मिळाला. मागील सव्वादोन दशकांपासून पुतिन यांनी दूरदृष्टी आणि नेतृत्वाने भारत–रशिया संबंधांना सातत्याने नवी उंची दिली आहे.”
मोदी यांनी पुतिनबद्दल “माझा मित्र” असा उल्लेख करत त्यांच्या “अढळ बांधिलकी आणि प्रामाणिक मैत्रीबद्दल” आभार मानले.
युक्रेन संघर्षावर भारताची भूमिका स्पष्ट
युक्रेन–रशिया युद्धाबाबत पीएम मोदी म्हणाले, “भारत संघर्षाचे शांततापूर्ण समाधानाचे मी समर्थन करतो. संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढील मार्ग आहे.”
ऊर्जा, अणुऊर्जा आणि खनिज क्षेत्रातील भागीदारी मजबूत
ऊर्जा सहकाराबद्दल मोदी म्हणाले, “ऊर्जा सुरक्षा हा आपल्या भागीदारीचा एक मजबूत स्तंभ आहे. हे सहकार्य पुढेही कायम राहील.”
त्यांनी पुढे सांगितले, नागरी अणुऊर्जेतील सहकार्य दशकांपासून प्रभावी आहे. क्रिटिकल मिनरल्समधील भागीदारी जागतिक पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी महत्त्वाची आहे.
भारताचे मनःपूर्वक आभार- राष्ट्राध्यक्ष पुतिन
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताच्या स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व भारतीय सहकाऱ्यांचे स्वागताबद्दल आभार. पंतप्रधान मोदींनी काल त्यांच्या निवासस्थानी दिलेल्या खास डिनरसाठीही धन्यवाद.”
पुढे ते म्हणाले, “आमची चर्चा अत्यंत उपयुक्त अशी झाली. मी आणि पीएम मोदी यांच्यात जवळचे कामकाजाचे संबंध आहेत. आम्ही दोघेही भारत–रशिया संवादाची स्वतः देखरेख करतो.” पुतिन यांनी SCO समिटमधील मागील भेटीची आठवणही करून दिली.