ऑफिसमध्ये २५-३० वार करत एक्स गर्लफ्रेंडची हत्या; आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही फिरवला चाकू, धक्कादायक VIDEO व्हायरल

Mohali Dimple Murder Video: ही संपूर्ण घटना ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये आरोपी डिंपलचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे.
ऑफिसमध्ये २५-३० वार करत एक्स गर्लफ्रेंडची हत्या; आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही फिरवला चाकू, धक्कादायक VIDEO व्हायरल
ऑफिसमध्ये २५-३० वार करत एक्स गर्लफ्रेंडची हत्या; आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही फिरवला चाकू, धक्कादायक VIDEO व्हायरल
Published on

पंजाबमधील मोहाली येथे प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची तिच्याच एक्स बॉयफ्रेंडने ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने हल्ल्यानंतर स्वतःच्या गळ्यावरही चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

ऑफिसमध्येच घडला धक्कादायक प्रकार

पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.४) संध्याकाळी ही घटना घडली. हरविंदर मान उर्फ हॅरी असे आरोपीचे नाव आहे. तो संध्याकाळी सुमारे ७.४० वाजता ऑफिसमध्ये पोहोचला आणि त्याने तिथे काम करत असलेल्या डिंपलवर अचानक मागून हल्ला केला. ही संपूर्ण घटना ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये आरोपी डिंपलचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे.

तरुणीचा पळून जाण्याचा प्रयत्न

हल्ल्यानंतर डिंपलने स्वतःचा बचाव करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत दरवाज्याजवळ तिचे केस पकडून तिला ओढले. यावेळी ऑफिसमधील काही कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत डिंपलला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीला थांबवण्यात त्यांना यश आले नाही.

तरुणीवर अनेक वेळा चाकूने वार

माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीने डिंपलवर २५ ते ३० वेळा चाकूने वार केले. गंभीर जखमी झाल्यानंतर ती जमिनीवर पडली, तरीही आरोपीचा हल्ला सुरूच होता.

तरुणीवर वार केल्यानंतर आरोपी पुन्हा ऑफिसमधील दुसऱ्या भागात गेला आणि त्याने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

आरोपीची प्रकृती गंभीर

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या गळ्यावरही अनेक वेळा वार केले. घटनेनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. दोघांनाही तातडीने फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी डिंपलला मृत घोषित केले, तर आरोपी हॅरीवर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांच्या माहितीनुसार, हॅरी आणि डिंपल हे पॅकर्स अँड मूव्हर्स क्षेत्राशी संबंधित एका कंपनीत जवळपास तीन वर्षे एकत्र काम करत होते. या काळात त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती. मात्र, काही काळापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपी पुन्हा तरुणीसोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याला नकार मिळाल्याने हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले आहेत. आरोपी आणि मृत तरुणीच्या नात्याबाबतही पोलिस तपास करत आहेत. दोघेही पटियाला येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in