
नवी दिल्ली : जर भारतातील हिंदू समाज मजबूत झाला, तरच जगभरातील हिंदूंना आपोआप बळ मिळेल. हे काम चालू आहे, पण अद्याप पूर्ण झालेले नाही. हळूहळू पण निश्चितच, ती परिस्थिती येणार आहे. हिंदू समाज व भारत एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. त्यांची मुळं खूप खोल आणि घट्ट आहेत. हिंदू समाज सशक्त होईल तेव्हाच भारतही मजबूत होईल आणि त्यातून भारताला सन्मान मिळेल, भारताची दखल घेतली जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी केले.
आरएसएसचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर वीकली’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मोहन भागवत म्हणाले की, “यावेळी बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध ज्या प्रकारचा संताप व्यक्त करण्यात आला आहे, तो यापूर्वी कधीही पाहिला गेला नव्हता. त्यामुळे आता तेथील स्थानिक हिंदूही म्हणतात, आम्ही पळून जाणार नाही. आम्ही इथेच राहू आणि आमच्या हक्कांसाठी लढू. आता हिंदू समाजाची अंतर्गत ताकद वाढत आहे. जगात कुठेही हिंदू असतील, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करून त्यांच्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल.”
मोहन भागवत म्हणाले, “हिंदूंच्या प्रतिष्ठेतूनच भारताला गौरवप्राप्ती होईल. जे लोक आज स्वतःला हिंदू मानत नाहीत ते देखील कधीकाळी हिंदू होते. तरीदेखील त्यांना आपल्याबरोबर घेऊन पुढे जाण्याची क्षमता व इच्छा केवळ हिंदूंमध्येच आहे आणि हिंदू सुमदाय ती इच्छा दाखवत आला आहे. भारतातील हिंदू समाज एकवटला, सशक्त झाला तर जगभरातील हिंदूंना त्यातून बळ मिळेल.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष म्हणाले, “बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत. पूर्वीपासून ते होताहेत. परंतु, यावेळी त्याविरोधात जो संताप व्यक्त झाला, तो यापूर्वी कधीही पाहायला मिळाला नव्हता. हिंदू समाजाचे संघटन होत आहे. ही ताकद आणखी व्यापक होईल. हिंदू सुरक्षेचे ध्येय पूर्ण होईपर्यंत आपल्याला आपला लढा चालू ठेवावा लागेल.”