

हैदराबाद : आई आणि मुलाचं नातं जगातील सर्वात निस्वार्थी मानलं जातं. पण तेलंगणातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने या नात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. विवाहबाह्य संबंधांमध्ये मुलगा अडथळा ठरतोय म्हणून एका महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे मुलाचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगून प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, पतीच्या संशयामुळे तब्बल २० दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती आणि स्वामी हे दाम्पत्य तेलंगणातील सिद्धीपेट जिल्ह्यातील टीगुल गावचे रहिवासी आहे. स्वामी हा कॅब चालक असून कामानिमित्त अनेकदा घराबाहेर असायचा. त्यांना दोन वर्षांचा हरीकृष्णा नावाचा मुलगा होता.
पती घराबाहेर, प्रियकर घरात
पोलिसांच्या तपासात ज्योतीचे नवीन नावाच्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचे समोर आले आहे. पती कामावर गेल्यानंतर नवीन तिच्या घरी येत असल्याचा आरोप आहे. २९ मे रोजीही स्वामी कामासाठी बाहेर गेला असताना नवीन ज्योतीच्या घरी आला होता.
याच वेळी दोन वर्षांचा हरीकृष्णा रडू लागला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलगा त्यांच्या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याची भावना दोघांच्या मनात निर्माण झाली होती. नवीनने हरीकृष्णा हा त्यांच्या मार्गातील काटा असल्याचे सांगत त्याला दूर करण्यासाठी ज्योतीला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ज्योती आणि नवीन यांनी मिळून हरीकृष्णाला उचलून जोरात जमिनीवर आपटले. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला, असे तपासात समोर आले आहे.
पतीला सांगितली वेगळीच कहाणी
घटनेनंतर ज्योतीने रडण्याची नाटकं करत पतीला मुलाचा मृत्यू फिट आल्यामुळे झाल्याचे सांगितले. पत्नीवर विश्वास ठेवत स्वामीने कोणताही संशय न घेता मुलाचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी टीगुल येथे नेला. तेथे नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलाचा मृतदेह दफन करण्यात आला. काही दिवसांपर्यंत त्याला कोणताही संशय आला नाही. मात्र, कालांतराने ज्योतीच्या वागण्यात झालेला बदल पाहून स्वामीच्या मनात शंका निर्माण झाली. त्याने ज्योतीची कडक शब्दांत चौकशी केली असता तिने घाबरून गुन्ह्याची कबुली दिली.
पोस्टमार्टम अहवालातून उघड झाले सत्य
ज्योतीच्या कबुलीनंतर स्वामीने तात्काळ कीसारा पोलीस ठाणे गाठून पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध हत्येची तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत टीगुल गावातील स्मशानभूमीत जाऊन चिमुकल्याचा मृतदेह थडग्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने मृतदेहाचे पुन्हा शवविच्छेदन केले. या अहवालात डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी ज्योतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
आई अटकेत, प्रियकर फरार
पोलिसांनी ज्योतीला अटक केली असून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील दुसरा संशयित नवीन अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.